कमलाकर शेटे/आशिष काळे
पुणे : कात्रजच्या बोगद्यातून बाहेर येतानाच या रस्त्याचा उतार जाणवतो. वाहन एकदम वेगात पुढे जाते. दुचाकीच्या शेजारून जाणाऱ्या मालमोटारीचा वेग तर कितीतरी जास्त असतो. या वेगावर नियंत्रण मिळविणे ही मुश्कील गोष्ट असल्याचे लगेचच लक्षात येते. यावरून कात्रज बोगद्यानंतरचा भाग जणू ‘यमदूत’ ठरत आहे.
जास्त वजन असलेली कितीतरी वाहने भरधाव येतात. त्यांचा वेग धडकी भरविणारा असतो. जांभूळवाडी- नऱ्हेजवळ उतार आहे. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी पांढऱ्या व पिवळ्या पट्ट्यांचा (रम्बलर स्ट्रीप) लावला आहे. मात्र, वाहने सावकाश चालवावी, असे फलक लावलेले दिसत नाहीत.
नवीन कात्रज बोगद्यातूनसुद्धा ताशी ६० किलोमीटर वेगमर्यादा असताना त्यापेक्षा जास्त वेगाने वाहने जातात. तेथून पुढे जागोजागी गाडी हळू चालवा, बंद करू नका, न्यूट्रल करू नका, असे फलक आहेत. मात्र, एकही वाहनचालक त्याकडे पाहताना दिसत नाही. तर काही फलक झाडांमध्ये झाकले गेल्याने चालकांना दिसतही नाहीत. त्यामुळे या सूचना प्रत्यक्षात आणल्याच जात नाहीत.
नऱ्हे येथील रस्त्यांच्या मध्यभागी असलेले दिवे बंद आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने थांबा नसलेल्या ठिकाणी प्रवाशांना उतरवतात. त्यामुळेही अपघात होऊ शकतो. महामार्गाच्या बाजूची छोटी झाडे तोडून स्वच्छता करण्यात येत आहेत. नवले पुलाजवळ अपघात झालेल्या भागात विविध ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी चार लेअरच्या पट्ट्या बसवल्या जात आहेत. मात्र, वाहनचालक वेग कमी न करता या पट्ट्यांवरूनच वाहन वेगात पुढे नेताना दिसतात.
नवले पुलाजवळ पर्यायी रस्त्याने कात्रज किंवा सिंहगडकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे हा रस्ता नवीन वाहनचालकांच्या लक्षातच येत नाही, परिणामी पुलावर जाऊन पुन्हा वाहने हळूहळू रिव्हर्स घेऊन यावी लागत आहे. यातूनच अपघात होतात. वाहन हळू चालवावे हा नियम वाहनचालक पाळत नाहीतच; पण त्यांनी ते नियम पाळावेत म्हणून यंत्रणाही काही करताना दिसत नाही. संपूर्ण रस्त्यावर पोलिस नाहीत, कोणी अडवताना दिसत नाही.