लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागील वर्षीच्या तुलनेत शहरातील विद्यार्थ्यांनी ‘नीट’मध्ये परीक्षेत चांगली प्रगती केल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. पुण्यातून सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. त्यापैकी सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी ३६० पेक्षा अधिक म्हणजे ५० टक्के गुण मिळविले आहेत. तर सुमारे ७५ विद्यार्थ्यांना ५०० किंवा त्याहून अधिक गुण मिळविता आले आहेत. ही आकडेवारी पाहता पुण्यातील विद्यार्थ्यांची कामगिरीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. नीट २०१३ आणि नीट २०१६ या दोन्ही वर्षी साधारपणे पुण्यातील १५० विद्यार्थ्यांनी ३६० हून अधिक गुण मिळवले होते. या परीक्षेचा निकाल ८ जून रोजी अपेक्षित असताना मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे निकाल लांबणीवर पडला होता. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निकालाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पुण्यातील अभिषेक डोगरा हा विद्यार्थी ७२० पैकी ६९१ गुण मिळवून देशात पाचवा, तर राज्यात पहिला आला आहे. तर पुण्यातीलच ऋचा हेर्लेकर हिने ६८० गुणांसह देशात ३३ वा क्रमांक मिळविला आहे. अभ्यासातील सातत्यामुळे यशअभिषेक डोगरा याचे दहावीपर्यंतचे शिक्षण कोथरूडमधील न्यू इंडिया स्कूलमध्ये झाले आहे. त्याला राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत ९४.०६ टक्के गुण मिळाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा विचार त्याने नववीमध्येच केला होता. त्यानुसार अकरावी व बारावीसाठी त्याने राजस्थामधील कोटा येथील सीबीएसईच्या शाळेत प्रवेश घेतला. तिथेच त्याने खासगी क्लासही लावला होता. त्याचे वडील वीरेंद्र डोगरा मूळचे पंजाबचे तर आई पालघरची असून २००५ पासून ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. अभिषेकच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना त्याची आई कोमल डोगरा म्हणाल्या, अभिषेक गुणवत्ता यादीत येईल याची खात्री होती. पण देशात पाचवा आणि राज्यात पहिला येईल, असे वाटले नव्हते. त्याने सातत्यपूर्ण अभ्यास करीत हे यश मिळविले आहे. दहावीपर्यंत तो तेवढा गंभीर नव्हता. पण नंतर त्याने पूर्णवेळ नीटवर लक्ष केंद्रित केले. त्याला पुढे संशोधनामध्ये आपले करिअर करायचे आहे.जुळ्या बहिणींना यशशरयू आणि वैष्णवी निपाणीकर या जुळ्या बहिणींनी नीट परीक्षेत अनुक्रमे ६१९ आणि ५९३ गुण मिळवत यश संपादन केले आहे. त्यांना देशात गुणवत्ता यादीत १३९१ आणि ३५३० क्रमांक मिळाला आहे. शरयू आणि वैष्णवीने जेईई मेन्स परीक्षा, एमएचटी-सीईटी परीक्षेत यश मिळविले असून, वैष्णवी जेईई अॅडव्हान्समध्येही गुणवत्ता यादीत आली आहे. ती जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे.४देशात ३३वा क्रमांक मिळवलेली ऋचा हेर्लेकर हिला एकूण ६८० गुण मिळाले आहेत. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण अभिनव इंग्लिश स्कूल या शाळेतून झाले असून, तिला दहावीला ९६.४ टक्के तर बारावीला ९० टक्के गुण मिळाले आहेत. ‘वैद्यकीय क्षेत्राकडे जाण्याचे तिने पूर्वीपासूनच ठरविले होते. अभ्यासातील सातत्य आणि प्रामाणिकपणामुळे ती यश मिळवू शकली आहे,’ असे तिची आई रुपा हेर्लेकर यांनी सांगितले.
पुण्यातील विद्यार्थ्यांचे ‘नीट’मध्ये यश
By admin | Published: June 24, 2017 6:05 AM