लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) १११व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखिका यास्मिन शेख यांना, तर ‘भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ डॉ. सु. प्र. कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. येत्या २७ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि कार्यवाह उद्धव कानडे या वेळी उपस्थित होते. ‘मसाप उत्कृष्ट शाखा पुरस्कार चाळीसगाव शाखेला देण्यात येणार आहे. रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘मसाप उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार’ मसापच्या माजी कार्यवाह नंदा सुर्वे व नंदकुमार सावंत यांना देण्यात येणार आहे.अमृतमहोत्सवी वर्षात वाटचाल करणाऱ्या मसापच्या सोलापूर शाखेचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तर, २६ मे रोजी विविध ग्रंथांना प्रसिद्ध कन्नड लेखिका वैदेही यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ कुमठेकर रस्त्यावरील महात्मा फुले सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होईल. प्रा. जोशी म्हणाले, ‘‘यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयांना आयुष्य वाहून घेतले. डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराचे मानकरी असलेले डॉ. सु. प्र. कुलकर्णी यांनी ३२ वर्षे मसाप कार्यकारिणीवर नगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. ते दहा वर्षे मसाप पत्रिकेचे संपादक होते.’’
यास्मिन शेख यांना जीवनगौरव
By admin | Published: May 13, 2017 5:02 AM