गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य शासनाच्या आदेशाने साथ प्रतिबंध उपाययोजना अंतर्गत ब्रेक द चेन मोहिमेनुसार संचारबंदी तसेच धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी आणि भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा होणार नसल्याचे जानुबाई देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
धनकवडी गावठाण परिसरात देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात येते. लालभडक गुलालाची उधळण, ग्रामप्रदक्षिणा घेत मिरवणूक संपल्यानंतर महाआरती होते. अखिल जानुबाई दहीहंडी उत्सव ट्रस्टच्या वतीने दरवर्षी बाल मेळावा, महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र सलग दुसऱ्या वर्षी यात्रा आणि यात्रेच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची खंत जानुबाई दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
चौकट - जानुबाईदेवीची यात्रा हा धनकवडीमधील भाविकांसाठी मोठा आनंद उत्सव असतो. तर व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी तेजीचा हंगाम असतो. यात्रेच्या माध्यमातून व्यावसायिकांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. परिसरातील नागरिक दर्शनासाठी येथे येत असतात. पूजा साहित्य, खण-नारळ, रेवड्यांचा प्रसाद, खेळण्यांची मोठी विक्री होते. शिवाय थंड पेयांच्या विक्रेत्यांचाही व्यवसाय चांगला होत असतो, पण ऐन हंगामात या कोरोनामुळे इथल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. - जानुबाईदेवी देवस्थान ट्रस्ट - अध्यक्ष - बापूसाहेब धनकवडे