येथील ग्रामदैवत शिरसाईदेवीच्या यात्रा उत्सवाला सालबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील चैत्र कृष्ण नवमीला फक्त पूजाऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत महापूजा करून बुधवार (दि.५) रोजी घटस्थापनेने सुरुवात झाली.
त्यानंतर सलग नऊ दिवस देवीची विधिवत महापूजा आणि आरतीचा कार्यक्रम पूजाऱ्यांच्या वतीने होत असून गुरुवार (दि.१३) रोजी वैशाख शुक्ल द्वितीयेला देवीची विधिवत महापूजा करून पहाटे घटोत्थापन होणार आहे.
त्यानंतर शनिवार आणि रविवार (दि.१५ व १६) रोजी मुख्य यात्रा असणार आहे. परंतु गतवर्षी प्रमाणेच यंदा देखील कोविड १९ चा प्रादुर्भाव जास्त असल्याकारणाने यंदाची रावणगावची शिरसाईदेवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रावणगाव शिरसाईदेवी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
यात्रा रद्द करण्यात आली असल्यामुळे यंदा विविध धार्मिक कार्यक्रम, शोभेचे दारूकाम तसेच तमाशाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.
कोरोनाचे महाभयानक संकट असल्याकारणाने यात्रेच्या कालावधीत मंदिर आणि परिसरात दर्शनासाठी कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.