पिंपरी - गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये विविध आजारांनी थैैमान घातले आहे. स्वाइन फ्लू, डेंगीने आरोग्य विभागाला ताप दिला असून, आता इतर गंभीर आजारांवरील औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे आरोग्य विभागच सलाईनवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गेल्या तीन महिन्यांपासून महापालिका रुग्णालयामध्ये औषधांची टंचाई भासू लागली आहे. महापालिका रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याने रुग्णांना बाहेरून जादा पैैसे खर्च करून औषधे घ्यावी लागत आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये सध्या अनेक औषधांचा तुटवडा जाणवत आहे. श्वानदंशावरील लस उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा व हृदयविकार या औषधांचा साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला ऐनवेळी धावपळ करावी लागते. रुग्णांनी तपासणी करून घेतल्यानंतर लिहून दिलेली औषधे बाहेरून घ्यावी लागतात. त्यामुळे रुग्णांनाही त्याचा फटका बसत आहे.वास्तविक महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाहेरून औषधे आणण्यास बंदी आहे. डॉक्टरांनी बाहेरील खासगी मेडिकलमधून औषधे आणण्यास सांगणे अपेक्षित नाही. मात्र औषधांचा तुटवडा असल्यामुळे डॉक्टर बाहेरून औषधे घेण्यास सांगतात. त्यामुळे रुग्णांच्या खिशाला कात्री लागत आहे. वायसीएम रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच शहराबरोबरच राज्यातील कानाकोपऱ्यातून येथे रुग्ण उपचारासाठी येत असतात. या सर्व रुग्णांची परिस्थिती सामान्य असते. त्यामुळे या रुग्णांना बाहेरुन औषधे आणताना विनाकारण आर्थिक झळ सोसावी लागते.रेबीज लसीचाही तुटवडागेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये रेबीज प्रतिबंधक लसीचा तुटवडा आहे. ही लस कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे महापालिकेच्या एकारुग्णालयात लस कमी पडली, तर दुसºया रुग्णालयातूनमागवून घ्यावी लागते.त्यामुळे रुग्णांची विनाकारण फरपट होते.काही औषधांचा तुटवडा आहे. मात्र शहरातील दुसºया रुग्णालयातून औषधांचा पुरवठा करून रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाते. सध्या निविदा व जीएसटी या तांत्रिक गोष्टींमुळे औषधे येण्यास उशीर होत आहे. मात्र येत्या दोन-चार दिवसांत ही औषधे उपलब्ध होतील.’’- डॉ. शंकर जाधव, उपवैद्यकीय अधिकारी, वायसीएम
वायसीएम रुग्णालय : शहरात औषधांची टंचाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 2:06 AM