लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “सन १९९२. शिवतीर्थ (मुंबईतील शिवाजी पार्क) भरलेलं होतं. बाळासाहेबांच्या (ठाकरे) शेजारीच मी बसलो होतो. याप्रसंगी व्यासपीठावर अनेक नेतेमंडळीसुद्धा होती. अचानक बाळासाहेब मला म्हणाले, ‘तू बोलणार आहेस ना.’ मी म्हटलं, ‘तू काहीतरी बोलू नकोस हं...नाही तर मी येथून निघून जाईन.’ त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘नाही नाही, तू आज बोललंच पाहिजे.’ हे सगळं आम्हा दोघांचं सुरू होतं.. आणि एकदम बाळासाहेब म्हणाले, ‘तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू,”... या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा रंजक किस्सा सांगितला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त मनसेने आयोजित केलेल्या शिवशाहीर करंडक स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला राज ठाकरे शनिवारी (दि. ४) उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी हा किस्सा सांगितला. मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, किशोर शिंदे, बाबू वागसकर, रणजित शिरोळे, अजय शिंदे, रुपाली पाटील आदी मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
राज ठाकरे म्हणाले, “इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले. तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमतच होत नव्हती. मी कधी बोलू शकेन आणि भाषण करू शकेन. यावर देखील माझा कधीच विश्वास नव्हता. आजपर्यंत मी अनेक वक्ते ऐकले आहेत. आमच्या घरात तर माननीय बाळासाहेब होतेच. शिवाय श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नाडिस, अटलबिहारी वाजपेयीजी यांसारख्या अनेक वक्त्यांना मी अगदी जवळून पाहिले व ऐकलेसुद्धा आहेत. मात्र लहानपणापासून जरी अनेक दिग्गज वक्त्यांना मी पाहत-ऐकत आलो असलो तरी आयुष्यात मी कधी बोलेन, असं कधीच वाटलं नव्हतं.”
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हटल्यानंतर शिवराय ही गोष्ट आलीच. त्याच अनुषंगाने शिवराय यांच्यावर दोन विषय घेऊन ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतून वक्ते तयार होणे ही महत्वाची गोष्ट आहे. आता मी चार-पाच जणांची भाषणं ऐकली. त्या सर्वांचा मला हेवाच वाटतो. मी माझ्या शालेय जीवनात कधी वक्तृत्व स्पर्धेत कधी भागच नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं, असा प्रश्न पडायचा. तसेच जे बोलतात त्यांच्याबद्दल मला नेहमी कुतहूल वाटायचं, अशीही आठवण राज यांनी सांगितली.