पुणे : अभियांत्रिकीची क्रेझ कमी झाल्याचे यंदाही स्पष्ट झाले आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठीची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया शनिवारी संपली असून, सुमारे ६१ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामध्ये पुणे विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील १६ हजार ८७५ जागा आहेत. काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रतिसाद मिळताना दिसत नाही. दर वर्षी हजारो जागा रिक्त राहत आहेत. कोणताही निकष न पाळता राज्यात सरसकटपणे अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्याने ही स्थिती उद्भवली आहे. त्यातच अभियांत्रिकीला पूर्वी असलेली क्रेझही कमी झाली आहे. पदवी घेऊनही अपेक्षित संधी मिळत नसल्याने विद्यार्थी याकडे पाठ फिरवत आहेत. अनेक विद्यार्थी दहावीनंतरच अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. पदविका पूर्ण झाल्यानंतर त्यांना पदवीला थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. तसेच, आयटीआयकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. तसेच, अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई परीक्षा अनिवार्य केल्यानेही विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे जाणकार सांगतात.मागील वर्षीही राज्यातील रिक्त जागांचा आकडा ६१ हजारांच्या जवळपास होता, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)-शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी राज्यात अभियांत्रिकीची प्रवेशक्षमता एकूण १ लाख ५६ हजार ९९५ एवढी होती. -केंद्रीय प्रवेशप्रक्रियेंतर्गत शनिवारी शेवटची समुपदेशन फेरी पार पडली. या फेरीअखेर राज्यात तब्बल ६० हजार ८७४ जागा रिक्त राहिल्या आहेत. -समुपदेशन फेरीत ८ हजार ९७२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. अशा एकूण राज्यात ९६ हजार १२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. -पुणे विभागातील पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये १६ हजार ८७५, सोलापूर विद्यापीठांतर्गत ३ हजार ७७५, तर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठांतर्गत ७ हजार ३६८ जागा रिक्त राहिल्या आहेत.
यंदाही ६१ हजार जागा रिक्त राहणार
By admin | Published: July 28, 2015 12:49 AM