पुणे : यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेकडून वर्तवण्यात आला आहे. यंदा सरासरीच्या 93 टक्के इतकाच पाऊस पडेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. प्रशांत महासागरात एल निनाे या चक्री वादळाचा प्रभाव असल्याने पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्कायमेट या हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या खासगी संस्थेकडून यंदाच्या मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 887 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात मध्य भारतात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. मान्सूनची सुरुवातच निराशाजनक असून जून महिन्यात पाऊस कमी पडणार आहे. परंतु मान्सूनचा दुसरा टप्पा काहीसा दिलासादायक असणार आहे. सप्टेंबरपेक्षा ऑगस्टमध्ये चांगला पाऊस हाेण्याची शक्यता आहे. मार्च- मे महिन्यात एल निनाे या चक्रीवादळाचा 80 टक्क्यांवरचा प्रभाव जून ते ऑगस्ट दरम्यान 60 टक्क्यांपर्यंत कमी हाेण्याची शक्यता आहे. तरीही यंदाचा मान्सून हा सरसरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
भारतात जून मध्ये सरासरी 164 मिलीमीटर, जुलै मध्ये 289 मिलीमीटर, ऑगस्ट मध्ये 261 मिलीमीटर तर सप्टेंबर मध्ये सरासरीच्या 173 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर हाेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.