पुणे, दि. 10 - दहीहंडीच्या ऐन तोंडावर राज्यभरातील लाउडस्पीकर व्यावसायिकांनी उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याची हाक दिली आहे. पोलिसांकडून होणाऱ्या मारहाणीच्या आणि कारवाईच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात येत असल्याने सणासुदीच्या काळात राज्यभरात लाउडस्पीकर बंद राहणार आहेत.पुण्यात झालेल्या बैठकीत साऊंड अँड जनरेटर्स असोसिएशनने बंदची हाक दिली. पोलिसांकडून डी.जे.चालकांना होणारी मारहाण, क्षुल्लक कारणावरून साऊंड सिस्टम जप्त करण्याची होणारी कारवाई आणि होणारा छळ या विरोधात हा बेमुदत संप पुकारण्यात येत असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. सामान्य वातावरणाचा आवाजही ५५ डेसिबल असतो. मग स्पीकर वाजवायचे तरी कसे? असा सवाल करतानाच पोलिसांकडे डेसिबल मोजण्याची यंत्रणाही नाही, असेही असोसिएशनने स्पष्ट केले. हा संप राज्यव्यापी असणार असून या संपाला साऊंड व्यावसायिकांची मातृसंस्था असलेल्या 'पाला' या संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. दहीहंडीसह कोणत्याही सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमात लाउडस्पीकर वाजविण्यात येणार नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केल्याने उत्सव मंडळांचे धाबे दणाणले आहेत.
पुण्यात यंदाची दहीहंडी लाउडस्पीकरविना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 7:44 PM