पुणे: साहित्य संंमेलन, हॉटेल, बसस्थानके, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणच्या गर्दीतून कोरोना विषाणू पसरत नाही. मग सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवामधूनच त्याचा प्रसार होईल असे शासनाला का वाटते, असा सवाल कलाकारांनी उपस्थित केला आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने यंदा हा महोत्सव किमान ५० टक्के उपस्थितीसह साजरा करु द्यावा असे आवाहन करत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रसिक मंडळींनी मोहीम सुरू केली आहे.
हा महोत्सव कधी घेण्यासाठी उत्सुक आहात असा प्रश्न गुगल फॉर्मद्वारे विचारला जात आहे. यात पन्नास टक्के लोकांच्या उपस्थितीमध्ये कोव्हीडचे नियम पाळून किंवा फेब्रुवारी महिन्यात जन्मशताब्दी वर्षाबरोबर की कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. हा गुगल फॉर्म सर्व कलाकार आणि रसिकांना पाठविला जात आहे.
जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव गेली सात दशके सुरू आहे. गेल्यावर्षी कोरोना निर्बंधांमुळे हा महोत्सव रद्द झाला. यंदाही ‘खुल्या मैदानांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २५ टक्के उपस्थितीची अट राज्य शासनाने घातली असल्याने हा महोत्सव होऊ शकणार नाही,’ असे निवेदन महोत्सवाचे आयोजक आर्य संगीत प्रसारक मंडळाने प्रसिद्ध केले आहे. मात्र तो व्हावा अशी महोत्सवाच्या जगभरच्या चाहत्यांची इच्छा आहे.
“सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाने अनेक पिढ्या संस्कारित केल्या आहेत. महोत्सव इतकी वर्षे होत आहे त्याला काहीतरी अर्थ आहे ना? संगीत केवळ चरितार्थाचे साधन नाही, तर ती एक साधना आहे. यंदा पंडितजींचे जन्मशताब्दी वर्ष आहे. हा महोत्सव व्हायला हवा असे तबलावादक पंडित विजय घाटे यांनी सांगितले आहे.''
“गेली पावणेदोन वर्षे आम्ही कलाकार भरडले गेलो आहेत. बंदिस्त नाट्यगृहात एसी असूनही ५० टक्के क्षमतेने कार्यक्रमांना परवानगी आहे. पण खुल्या मैदानात मात्र २५ टक्के क्षमतेची अट हेच पटत नाही. खुल्या मैदानात किमान ५० टक्के उपस्थितीची परवानगी मिळावी या हेतूनेच सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रसिक मंडळींनी ही मोहीम सुरू केली आहे असे तबलावादक भरत कामत यांनी सांगितले आहे.''