आळंदी: अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान.. एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान' असे म्हणत बजरंग बलीच्या जयघोषात साजरा केला जाणारा श्री हनुमान जयंती उत्सव आळंदीत साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी मोजकेच भाविक उपस्थित होते. कोरोनाच्या महामारीमुळे भाविक नसले तरीही महाबली हनुमानाला कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घातले गेले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिरात विविध रंगाच्या फुलमाळांनी सजावट करुन हनुमानाची प्रतिकृती फुलमाळांमध्ये रेखाटण्यात आली होती.
कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे. मात्र परंपरेनुसार सण, उत्सव, विविध देव देवतांच्या जन्मोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानच्या वतीने समाधी मंदिरात फुलमाळांची सजावट करण्यात येत आहे.
तत्पूर्वी, आज पहाटे माऊलींच्या समाधीवर पवमान पूजा व दुधारती करण्यात आली. त्यानंतर हनुमान जन्मोत्सवाचे पठन करण्यात आले. माऊलींच्या मंदिरात फुलमाळांनी सजावट करण्यात आली. सूर्योदय होताच प्रथा व परंपरेचे पालन करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तर ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिराला आंब्याच्या पानांचे तोरण व पुष्पहार माळा लावण्यात आल्या. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई व दरवर्षाप्रमाणे मोठी सजावट करण्यात आली. मात्र साध्या पद्धतीने मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शनि मारूती, कुर्हाडे तालीम, घुंडरे तालीम, गोपाळपुरा आदी ठिकाणच्या मंदिरातही साध्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.