लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शाळा सुरू झाल्यानंतर किमान काही आठवड्यांत गणवेश मिळावा, या महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या इच्छेवर यंदाही पाणीच पडण्याची चिन्हे आहेत. गुणवत्ता नियंत्रण मंडळाने रिजेक्टचा शिक्का मारलेले जुने गणवेश विद्यार्थ्यांना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, तर तसे होऊ नये यासाठी गणवेशाचा रंग बदलण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. स्थायी समितीच्या सभेत बुधवारी तसा ठरावच करण्यात आला.सुमारे १ लाख विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने दर वर्षी गणवेशवाटप करण्यात येत असते. दर वर्षी कापडाची खरेदी निविदेच्या, नंतर गुणवत्तेच्या कसोटीत सापडते व विद्यार्थ्यांना अनेक महिने विलंबाने गणवेश मिळतात. मागील वर्षी त्यांनी शिवलेले गणवेश वादात सापडले होते. निविदेत नमुना म्हणून दिलेले कापड व प्रत्यक्षात वाटप करण्यासाठी आणलेले गणवेश यांच्यात दर्जाचा फरक होता. त्यामुळे गणवेश गुणवत्ता नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यात ते कसोटी पार करू शकले नाहीत. त्यामुळे रिजेक्ट करण्यात आले. त्यामुळे यंदा गणवेशवाटपाचा विषय स्थायी समितीमध्ये आल्यानंतर दिलीप बराटे, मंजूषा नागपुरे आदी सदस्यांनी जुन्या गणवेशाचा व दुकानांच्या यादीत संबंधित ठेकेदार असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्षांसह सर्व समिती सदस्यांनीही शंका उपस्थित केली.आयुक्त कुणाल कुमार यांनी तसे होणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र तरीही, गणवेशाचा रंगच बदलावा, अशी मागणी करण्यात आली. तसा ठरावच करण्यात आला. त्याचप्रमाणे थेट लाभ योजनेअंतगर्त गणवेश दुकानांमधून खरेदी केले जाणार असले, तरी त्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. काम एकाच ठेकेदार कंपनीला मिळेल. तो ठेकेदार अन्य दुकानांना पुरवठा करेल. यासाठी किमान महिना तरी लागेल. त्यामुळे रंग बदलूनच गणवेश द्यावेत, असे ठरावात नमूद करण्यात आले. त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली तर गणवेश मिळण्यास यंदाही विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गणवेशाच्या मनसुब्यावर यंदाही पाणीच
By admin | Published: June 29, 2017 3:49 AM