पुणे : वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे हे समजते; पण उमजत नाही, अशीच स्थिती वाहनचालकांची झालेली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जाऊ शकतो याची कल्पना असतानाही वाहनचालक सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडताना दिसत आहेत. पुण्यातल्या रस्त्यांवर वर्षाकाठी सरासरी ४०० लोकांचा अपघाती मृत्यू होतोय तर वर्षाला जवळपास चार हजार मद्यपी वाहनचालकांना कोठडीची हवा खावी लागत आहे. अपघातांमध्ये दोषी वाहनचालकांना मात्र शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी आहे.गेल्या तीन वर्षांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये तब्बल तेरा हजार मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. तर चालू वर्षात साडेबाराशे मद्यपी वाहनचालकांवर खटले भरण्यात आले आहेत. यासोबतच बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या तीन हजार २२२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी नुकत्याच सहा स्पीडगन विकत घेतल्या आहेत. या स्पीडगनच्या माध्यमातून जानेवारीपासून आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी ६०१ जणांवर कारवाई केली आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरातील रस्त्यांची रुंदी वाढत चालली आहे तर शहराच्या विस्तारामध्ये नियोजनाचा अभाव असल्यामुळे दूरदृष्टी ठेवून रस्त्यांचे नियोजन करण्यामध्ये महापालिका आणि शासकीय स्तरावर उदासीनता दिसून येत आहे. मोठ्या रस्त्यांवरून वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन ही तर नित्याचीच बाब झाली आहे. यामुळे पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालत जावे लागते. यासोबतच वाहनचालकांनाही शिस्तीचे धडे देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शिक्षणाचे माहेरघर, चळवळींचे उगमस्थान आणि आयटी पुणे अशी ओळख असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली आहे.
वर्षाला चार हजार मद्यपींवर खटले
By admin | Published: May 10, 2015 5:13 AM