पुणे:- यंदाचा ’किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ ओरिसामधील मुनीगुडा येथील डॉ. देबल देब यांना जाहीर झाला असून, बंगळूरच्या आरती कुमार राव यांना इको जर्नालिस्ट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. चौदावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दि. ३ ते ७ जानेवारी दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आणि अर्काइव्ह थिएटर, प्रभातरोड येथे रंगणार आहे. त्यानिमित्त देण्यात येणाऱ्या या दोन महत्वाच्या पुरस्कारांची घोषणा किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.च्या संचालक गौरी किर्लोस्कर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम,किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी महोत्सवाची माहिती देणा-या पुस्तिकेचे प्रकाशन किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.च्या संचालक गौरी किर्लोस्कर आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांच्या हस्ते करण्यात आले. बंगळुरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधील डॉक्टरेट आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, बर्कले, युनिव्हर्सिटी मधील फुलब्राइट स्कॉलर असलेले डॉ. देबल देब हे अग्रणी पर्यावरणशास्त्रज्ञ आहेत. ओरिसाच्या मुनिगुडाजवळच्या जंगलात त्यांनी बासुधा या छोट्याश्या शेताची स्थापना केली. पारंपारिक भात वाणांचे नष्ट होणारी जैवविविधता संवर्धन करण्यासाठी, तसेच सेंद्रिय शेती व बहुविध पिकाच्या पारंपारिक पध्दतींना प्रोत्साहन, प्रात्यक्षिक आणि समर्थन देण्यासाठी बासुधाची स्थापना केली गेली. केवळ पर्यावरणीय शेतीच नाही तर पर्यावरणीय वास्तूशास्त्र, जैवविविधता आणि पर्यावरणाशी संबंधित जीवनशैली देखील टिकली पाहिजे असे ते मानतात. १९९७ मध्ये डॉ. देब यांनी भारतातील सर्वात मोठी बिगर सरकारी बीज बँक, व्रिहीची स्थापना केली. व्रिही ही पूर्व भारतातील सर्वात मोठी, तांदूळ निर्यात करणारी जात आहे. ही बीज बँक, १४२० प्रकारच्या तांदूळ बीजांचे संगोपन करते आणि भारतातील १२ राज्यांमधील शेतकऱ्यांना बीज विनामूल्य दिले जाते. बंगळुरूच्या आरती कुमार राव या नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर आहे. एक स्वतंत्र पत्रकार या नात्याने त्या पर्यावरण छायाचित्रण, लेखन आणि कलेचे जतन करीत आहेत. दक्षिण आशियातील बदलते लँडस्केप आणि हवामान तसेच जीवनावश्यकता आणि जैवविविधतेवर होणारा परिणाम यावर त्यांचा अभ्यास आहे. चित्रपट महोत्सवाची सुरूवात यंदाच्या वसुंधरा मित्र पुरस्काराचे सन्मानार्थी दिग्दर्शक विजय बेदी यांच्या ग्रीन स्कर विजेत्या 'द पोलीसींग लंगूर' या चित्रपटाने होणार आहे. तर महोत्सवाचा समारोप जर्मनीतील दिग्दर्शक अंद्रेस एवल्स यांच्या 'द पायथन कोड' या चित्रपटाने होणार आहे. तसेच या महोत्सवात दिग्दर्शक विजय बेदी यांच्या चित्रपटांना विशेष स्थान देण्यात आले असून, द पायथन कोड या चित्रपटाने होणार आहे. द सिक्रेट लाईफ ऑफ फ्रॉग्ज हा अलीकडील चित्रपट देखील पहायला मिळणार आहे.गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ’इंटरडिपेन्डन्स’ हा बहुचर्चित चित्रपट पाहण्याची संधी देखील पुणेकरांना मिळणार आहे. तसेच हवामान बदल, वन्यजीव संवर्धन आणि हिमालय पर्वतरांगांच्या जैववैविध्यावर आधारित चित्रपट या महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहेत. तर महोत्सवाच्या माय मराठी विभागात अस्वस्थ उजनी आणि पाखरे सगे सोयरे हे दोन चित्रपट दाखवले जाणार आहेत.
यंदाचा’किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ डॉ. देबल देब आणि आरती राव यांना ‘इको जर्नालिस्ट’पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 7:11 PM
हवामान बदल, वन्यजीव संवर्धन आणि हिमालय पर्वतरांगांच्या जैववैविध्यावर आधारित चित्रपट या महोत्सवाचे खास आकर्षण
ठळक मुद्देचित्रपट महोत्सवाची सुरूवात ग्रीन स्कर विजेत्या 'द पोलीसींग लंगूर' या चित्रपटाने होणारआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ’इंटरडिपेन्डन्स’ हा बहुचर्चित चित्रपट पाहण्याची संधी