Pandharpur Wari: शासनाने यंदाचा पालखी सोहळा बायोबबल (जैव सुरक्षा कवच) पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 03:49 PM2021-05-30T15:49:20+5:302021-05-30T15:59:25+5:30
श्री संत तुकाराम महाराज संस्थानची मागणी
देहूगाव: शासनाने आयपीएल प्रमाणेच जैव सुरक्षा कवचामध्ये (बायोबबल) श्री संत तुकाराम महाराज ३३६ व्या पालखी सोहळ्यास पंढरपूरला नेण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केली आहे. यावेळी पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरया आणि विश्वस्त उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळ्या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच सभा घेतली होती. या सभेमध्ये मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनी मोजक्याच ५०० वारकऱ्यांसमवेत पायी वारीचा आग्रह धरला होता. या सभेत पुढील आढवड्यात या संदर्भात कॅबिनेट मध्ये चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेऊ असे पवार यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने बायोबबलला परवानगी दिल्यास श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्यात येईल.
बायोबबल म्हणजे काय?
जैव सुरक्षित वातावरण ( बायोबबल ) यामध्ये संबंधित व्यक्तींना आरोग्याचा अहवाल रोज सादर करावा लागतो. समाज, परिसर आणि नागरिकांपासून त्यांना १,२ किलोमीटर वेगळे ठेवले जाते. बायोबबलमध्ये त्यांना कोणीही व्यक्ती भेटू शकत नाही. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील केली जाते.
पालखी सोहळ्यात कसा असेल बायोबबल?
पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांने आरटीपीसीआर कोवीड तपासणी केल्याचा अहवाल संस्थानकडे सादर करावा. सदर वारकरीची वयोमर्यादा व शारिरीक क्षमता शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे राहिल. वारीमधील सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी संस्थानने नेमून दिलेल्या ठिकाणीच मुक्काम करावा. सोहळा सोडून इतरत्र बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात येवू नये तसेच त्यांच्या कोणत्याही वस्तूंचा स्विकार करू नये. पालखी मुक्कामाची ठिकाणे गावाच्या बाहेर मोकळ्या जागेत किंवा शाळा महाविल्यालये असेल. ही ठिकाणी मुक्कामापुर्वी व नंतर सॅनिटाईझ केली जावीत. प्रत्येक वारकऱ्याची दर तीन दिवसांनी कोवीड टेस्ट केली जाईल.
भोजनाची व राहण्याची व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात येईल. सहभागी वारकऱ्यांनी सॅनिटाईझरचा वापर करावा, मास्क लावणे बंधनकारक असून वेळोवेळी हात धुणे आवश्यक आहे. देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू परतीचा प्रवास बंधनकारक असेल. सोहळ्यात सहभागी होण्याअगोदर व नंतरही ७ दिवस विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक आहे. पालखी सोहळा कार्यक्रमामध्ये पालखी सोहळा प्रमुखांनी व शासनाच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी केलेल्या सुचनांचे पालन करावे लागेल. अशा प्रकारचे जैव सुरक्षा कवच पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे..