लक्ष्मण मोरेपुणे : ना कुठला गाजावाजा... ना खाद्यपदार्थांची रेलचेल... ना नवे कपडे... ना इफ्तार पाटर््या... ना मशिदींमधल्या सामुहिक नमाज... रमजानच्या महिन्यात गजबजून जाणारे कोंढवा-कौसरबाग-मोमीनपुरा-लष्कर परिसर यंदा मात्र शांत शांत आहेत. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या कर्फ्यूमुळे मुस्लिम बहुल भागातही शांतता पाहायला मिळत आहे. नागरिक घरामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंवरच सहेरी आणि इफ्तारी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.कोरोनामुळे सर्वच समाजाच्या सणांवर बंधने आली आहेत. मुस्लिम धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे रमजान. या महिन्याची सर्वजण आवर्जून वाट पहात असतात. परंतू, यंदा कोरोनाचे सावट या सणावरही पहायला मिळते आहे. दरवर्षी पहाटेपासूनच मशिदींसह कोंढवा, मोमिनपुरा आदी मुस्लिमबहुल भागात रेलचेल दिसते. मशिदींवर रोषणाई केलेली असते. या महिन्यात दिवसभर उपवास (रोजा) केला जातो. उपवासाला सुरुवात करण्यापुर्वी पहाटे (सहेरी) खाऊन घेतले जाते. तसेच संध्याकाळी उपवास (इफ्तार) सोडला जातो.नागरिक सहेरी आणि इफ्तारसाठी मोठ्या प्रमाणावर फळे, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करुन ठेवत असतात. विशेषत: कोंढवा, मोमिनपुरा, लष्कर भागात दुकाने सजलेली असतात. शहराच्या विविध भागामधून केवळ मुस्लिमच नव्हे तर अन्य धर्मिय नागरिकही या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी याठिकाणी येत असतात. परंतू, यंदा लॉक डाऊनमुळे हा संपुर्ण भाग बंद आहे. सर्व हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या, कपड्यांची दुकाने बंद आहेत. प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच नागरिक बाहेर पडून आवश्यक तेवढ्या वस्तू खरेदी करुन जातात. अनेकांकडे पैसेच उपलब्ध नसल्याने रमजान कसा साजरा करायचा असा प्रश्न आहे. रिक्षाचालकांपासून ते मोलमजुरी करणा-या कष्टक-यांना यंदाचा रमजान अगदी साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.लहान मुलांसह मोठेही आवर्जून कपडे खरेदी करीत असतात. मुलांसाठी खेळणी आणि विविध वस्तू आनंदाने खरेदी केल्या जातात. परंतू, यंदा कपडा बाजारही बंद असल्याने जुन्याच कपड्यांवर समाधान मानावे लागणार आहे. घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यावरच उपवास सोडले जात असून अनेकांना बाहेर चढ्या भावाने विकल्या जाणाऱ्या वस्तू विकत घेणे परवडत नाही. एवढे असतानाही नागरिकांकडून प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य दिले जात असल्याचे या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.=====घरामध्ये जे काही उपलब्ध आहे त्यावरच सहेरी किंवा इफ्तारी केली जात आहे. फळे महागली आहेत. अनेकांना केळी-कलिंगड सारखी स्वस्त फळेही खरेदी करणे अवघड झाले आहे. कष्टकरी वर्गासह श्रीमंत वर्गालाही यंदाचा सण अडचणीचा आहे. लोकांकडे पैसे नाहीत. समाजातील प्रतिष्ठितांकडून शिधा, फळे वाटप सुरु आहे. परंतू, देणाऱ्यांनाही मर्यादा आहेत. रमजानचा महिना असूनही फळांना उठाव कमी आहे. स्वस्त आणि महागडी अशी दोन्ही प्रकारची फळे खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.- हाजी उस्मानभाई शेख, फळ व्यापारी======कोंढव्यासह लष्कर, मोमिनपुरा या गांमध्ये यंदा खाद्यपदार्थ, कपडे, फळ बाजार बंद आहे. अनेक कुटुंबांसमोर अडचणी आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी मदत वाटप सुरु आहे. कोंढव्यातही दररोज दोन हजार कुटुंबांना जेवण पोचविले जात असून यासोबतच सफरचंद, केळे, आंबा, कलिंगड , टरबूज आणि खजूर ही फळे पोचविली जात आहेत. जेणेकरुन त्यांचा रमजान काही प्रमाणात का होईना आनंददायी व्हावा.- आबिद सय्यद, हॉटेल व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते
ग्राउंड रिपोर्ट : यंदाचा रमजान साधाच... कोंढवा-मोमीनपुराही शांत शांत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 6:00 AM
अनेकांकडे पैसेच उपलब्ध नसल्याने रमजान कसा साजरा करायचा असा प्रश्न
ठळक मुद्देइफ्तार घरातच : समाजातील प्रतिष्ठांकडून गरजूंना शिधा वाटप