देहूरोड : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जकात विभागाने जकात निरीक्षक, वरिष्ठ लिपिक व कर्मचाऱ्यांची कमतरता, जकात चुकवून जाणाऱ्या वाहनांना पकडणाऱ्या भरारी पथकाचा अभाव, अन्य सोई- सुविधांची वानवा, अशा प्रतिकूल परिस्थितीतही उच्चांकी उत्पन्न मिळविले आहे.नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जकात, पारगमन शुल्क व वाहन प्रवेश शुल्क कराची विक्रमी वसुली जकात विभागाने केली आहे. २० कोटी ४२ लाख २ हजार २०३ रुपयांचे उत्पन्न मिळवून आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (२०१५-१६) तुलनेत जकात विभागाचे ९७ लाख ३६ हजार २०३ रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. आर्थिक वर्षाअखेरीला दंडाची वसुली रक्कमही २६ लाखांवर गेली आहे. नोटाबंदीमुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये वसुली सर्वांत कमी झाली होती. कॅन्टोन्मेंटच्या जकात विभागात आर्थिक वर्षात पहिले पाच महिने मुख्य जकात अधीक्षकपद रिक्त होते. त्या वेळी जकात विभागाचा कार्यभार राहुल साळुंके यांनी सांभाळला होता. त्यानंतर सहा सप्टेंबरला भाग्यश्री शिंदे यांची जकात अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. विभागात जकात निरीक्षक, वरिष्ठ लिपिक यांच्यासह २४ कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही शिंदे यांच्यासह चंद्रकांत कुऱ्हाडे यांनी उपलब्ध कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्याने त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खासगीकरणविरोधी निर्णय योग्यच दोन वर्षांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक झाल्यांनतर पहिल्याच बैठकीत तत्कालीन सीईओ अभिषेक त्रिपाठी यांनी जकात विभागाचे जकात वगळून खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्या वेळी तत्कालीन अर्थ समिती अध्यक्षा अरुणा पिंजण यांनी जकात विभागातील अपुरी कर्मचारी संख्या असताना वसुली केली़ पुरेसे मनुष्यबळ दिले असते तर आणखी वसुली करणे शक्य झाले असते, असे विविध मुद्दे विस्तृत माहितीसह मांडून ठेक्याची राखीव किंमत पंधरा कोटींहून अधिक सुचविली होती. ही किंमत तत्कालीन मुख्याधिकारी त्रिपाठी यांनी प्रस्तावित राखीव किमतीपेक्षा अधिक असल्याने खासगीकरण प्रस्ताव बारगळला होता. त्यांनतर जकात विभागाचे सतत उत्पन्न वाढत आहे. उपाध्यक्षा अॅड. पिंजण, अर्थ समिती अध्यक्ष विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू यांच्यासह सर्वच सदस्यांनी जकात विभागाच्या खासगीकरणास विरोध केला होता. (वार्ताहर)>उत्पन्न : तीन वर्षे चढता आलेख जकात विभागाने २०१४-१५ या आर्थिक वर्षात १६ कोटी ९ लाख ६ हजार ७०६ रुपयांची वसुली केली. २०१५-१६ मध्ये वसुली १९ कोटी ४४ लाख ६५ हजार ५२१ रुपयांवर पोहोचली होती. गेल्या आर्थिक वर्षात २० कोटी ४२ लाख २ हजार २०३ रुपयांची वसुली केली आहे. यात जकातपोटी ५ कोटी १ लाख ३ हजार ४८० रुपये, पारगमन शुल्कापोटी १३ कोटी ५२ लाख ३७ हजार ३०० रुपये, वाहन प्रवेश शुल्कापोटी १ कोटी ८१ हजार ३५० रुपये, दंडापोटी २६ लाख ७ हजार ३३४ रुपयांचा समावेश आहे. मात्र, नोटाबंदीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जकात विभागाची वसुली १ कोटी ३६ लाख १३ हजार ५०८ रुपयांपर्यंत खाली आली होती.
जकात विभागाची यंदा विक्रमी वसुली
By admin | Published: April 08, 2017 2:07 AM