पुणे : राज्यात यंदाच्या वर्षी ऊसाची मुबलक उपलब्धता असल्याने ऊस गाळप हंगाम एक महिना अगोदर म्हणजेच एक ऑक्टोबरपासूनच सुरू करण्याचा निर्णय सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यातील साखर संकुलात बुधवारी ( 8 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात सलग दोन वर्षे झालेल्या दमदार पावसामुळे यंदा सुमारे ९४१ लाख टन ऊस गाळप होण्याचा अंदाजही बैठकीत व्यक्त करण्यात आला. १०६ लाख टन साखर उत्पादीत होण्याचा अंदाज आहे.
आगामी २०१८-१९ या वर्षांतील ऊस गाळप हंगामासाठी किती ऊस उपलब्ध असेल, गाळपाचे नियोजन, हंगामाची पूर्वतयारी, पूर्वहंगामी कर्जाची अपेक्षा, खेळत्या भांडवली कर्जाची उपलब्धता आणि कारखान्याची यंत्रसामग्रीची दुरुस्ती व देखभालीबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. याशिवाय अवसायनात असलेले कारखाने, बंद आणि आजारी साखर कारखाने सुरू करण्याच्या कामाचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. गेल्या गाळप हंगामात ९५३ लाख टन ऊसगाळप झाले होते. त्यातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.