जेजुरी - शिवसेनेचे युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सात वाजता जेजुरी गडावर जाऊन कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मात्र त्यांनी राजकीय भाष्य करण्यास नकार दिला. सेनेचे युवा नेते सद्या राज्यभर दौरा करीत आहेत. सांगोला येथील कार्यक्रम उरकून ते मुंबईला जात असताना जेजुरीत दर्शनाला आले होते. त्यांचे जेजुरीत भव्य स्वागत करण्यात आले. बारामती मार्गे जेजुरीला आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
या ठिकाणी जेजुरीकरांच्या वतीने काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन सोनवणे, माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख, बाळासाहेब दरेकर ,जेजुरी शहरप्रमुख किरण दावलकर, आदी महाविकास आघाडीच्या कार्यकर्यांनी स्वागत केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट जेजुरी गडावर जाऊन कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी ही उरकले. मार्तंड देवसंस्थांच्या वतीने प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त राजकुमार लोढा, पंकज निकुडे, शिवराज झगडे यांनी स्वागत केले. विविध संघटनांनी ही त्यांचा सन्मान केला. सरदार पानसे यांनी खंडोबाला वाहिलेली ४२ किलो वजनाचा खंडा उचलून सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जयमल्हार चा जयघोष ही केला. यावेळी त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ.सचिन अहीर, जिल्हा प्रमुख राजेंद्र काळे, पुरंदर तालुका प्रमुख अभिजित जगताप, पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव, सेनेचे युवा नेते संदीप धाडशी, माजी विश्वस्त प्रसाद खंडागळे आदींसह असंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण देवदर्शनासाठी येथे आलो आहोत. या पवित्र ठिकाणी आपण कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही. जे बोलायचे ते मी राज्यभर दौऱ्यात बोलत आहेच. खंडेरायाचे आपण दर्शन घेतले आहे. जे काही त्यांच्याकडे मागायचे ते मी मनोमन मागितले आहे. या व्यतिरिक्त आता तरी आपण काहीही बोलणार नाही असे म्हटले आहे.