पुणे : येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांची राज्य शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक उ. तो. पवार यांची नेमणूक केली आहे. याबाबतचा आदेश गृह विभागाने जारी केला असून, देसाई यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदी नेमण्यात आले आहे. येरवडा कारागृहामध्ये दहशतवादी कतिल सिद्दिकीचा कुख्यात शरद मोहोळने खून केल्यानंतर येरवडा कारागृहाची स्थिती सुधारण्यासाठी ३ वर्षांपूर्वी देसाई यांना पुण्यामध्ये आणण्यात आले होते. कारागृहातील वातावरण सुधारण्यासाठी तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी देसाईंनी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळातच मुंबई हल्ल्यातील पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आली. यासोबतच संजय दत्तही याच काळात येरवडा कारागृहात शिक्षा भोगायला आला. तीन वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केल्यामुळे देसाई बदलीला पात्र होते.ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक असलेले उ. तो. पवार यांची येरवडा कारागृहाच्या अधीक्षकपदी शासनाने केलेली नेमणूक वादामध्ये अडकली आहे. नागपूर कारागृहातील अनागोंदी काराभारावर अंकुश ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने पवार यांची ठाण्याहून नागपूर कारागृहाच्या रिक्त असलेल्या अधीक्षकपदावर बदली करण्यात आली होती; परंतु ’यिा आदेशामध्ये अंशत: बदल करून पवार यांची येरवडा कारागृहाच्या अधीक्षकपदी अचानक बदली करण्यात आली. ही बदली अचानक का बदलण्यात आली तसेच कशाच्या आधारे करण्यात आली, याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. शासनाने बदली केलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तत्काळ रुजू व्हावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
येरवडा कारागृह अधीक्षक देसाई यांची बदली
By admin | Published: May 07, 2015 5:22 AM