पुणे : अवघ्या महाराष्ट्रात बाबासाहेब पुरंदरे हे ‘शिवशाहीर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे काम, लेखन, वाचन अफाट होते. ते तरूणाईचे ‘स्फूर्तीस्थान’ आहेत. त्यांनी जे काम करून ठेवले आहे. त्यामुळे इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज हे ख-या अर्थाने महाराष्ट्राला नव्हे तर देशाला कळले. त्यांनी वेगवेगळे गड-किल्ले शोधून काढत त्याची खरी माहिती लोकांसमोर आणली आहे. इतिहासाचे वेड लावण्याचे काम बाबासाहेंबानी केले. हे भावनिक बोल तरुणाईने व्यक्त केले आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर वैकुंठ स्मशानभूमीचा परिसर तरूणाईच्या गर्दीने व्यापला होता. बाबासाहेबांनी शिवचरित्र घराघरात पोहोचविल्याने शिवरायांचा इतिहास लहानपणापासूनच तरूणाईच्या मनावर बिंबवला गेला. तरूणपिढीमध्ये इतिहासाविषयीची ओढ निर्माण करण्यात बाबासाहेबांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत अनेक तरूणांमध्ये गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठीची इच्छाशक्ती जागृत झाली. इतिहासाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी काही मुलांची पावले संशोधनाकडे देखील वळली. त्यांच्यापासून स्फूर्ती घेत छत्रपती शिवरायांविषयी नाविन्यपूर्ण प्रयोगातून पुस्तक किंवा नाट्यनिर्मिती करण्याकडे तरूणाईचा ओढा वाढला आहे. बाबासाहेबांकडे सहकार्य मागायला आलेल्यांना त्यांनी कधीच रिकाम्या हाताने पाठवले नाही. हेच त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. त्यामुळे बाबासाहेबांच्या अकस्मिक जाण्याने तरूणाईचा स्वर देखील दाटला होता. त्यांच्याविषयी तरूणाई भरभरून बोलत होती. बाबासाहेबांचे आयुष्यातील स्थान प्रत्येकालाच शब्दात व्यक्त करता येत नव्हते. पण ते आमचे ‘स्फूर्तीस्थान’ आहेत. हा एकच शब्दच त्यांच्या जीवनातील बाबासाहेबांचे महत्व अधोरेखित करीत होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून सहा वर्षे काम करणारा मिहीर मुळे म्हणाला, घराघरात आबालवृद्धापर्यंत बाबासाहेबांनी शिवाजी महाराज पोहोचविले. पु.ल नेहमीच बाबासाहेबांबद्दल एक वाक्य म्हणायचे की बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखा माणूस ज्यांनी शिवाजी महाराज इतक्या जवळून पाहिले आणि अनुभवले आहेत. मग ते गड-किल्ले किंवा मोहिमा असोत, प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब पायी फिरले आहेत. त्यांचे काम खूप मोठे आहे.प्रत्येकाच्या मनात त्यांचे काम हे अढळ राहील.