कल्याणराव आवताडे-
पुणे (धायरी): पुणे शहरात सध्या मास्क कारवाई सुरू आहे. सिंहगड रस्त्यावरील चौकात मास्क कारवाई सुरू असताना एका दुचाकीस्वाराला मास्क नाकाच्या खाली आल्याने थांबविले व दंड भरायला सांगितले. माझ्याकडे दंड भरायला पैसे नाहीत, हवं तर मला जेलमध्ये टाका, असा पवित्रा त्या दुचाकीस्वाराने घेतल्याने पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली.
सध्या चौका- चौकात पोलीस खात्यामार्फत करण्यात येत असलेल्या मास्क कारवाईमुळे पोलीस व नागरिकांत वाद होताना दिसून येत आहे. यातून पोलीस खात्याबद्दल नागरिक तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहेत.
गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. मास्क सक्ती असल्याने नागरिक पावसात भिजलेल्या अवस्थेत मास्क घालून दुचाकीवरून प्रवास करत आहेत. मात्र मास्क भिजल्याने श्वास घ्यायला त्रास होत असल्याकारणाने नागरिकांनी थोडा जरी मास्क खाली घेतला तरी पोलिसांकडून विना मास्कची कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिलेल्या ' टार्गेट ' च्या दबावामुळे पोलिसांना कारवाई करणे भाग पडत असल्याचे समजते. मात्र बऱ्याच वेळेला कारमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मास्क लावला नाही, म्हणून पोलीस कारवाई करून दंड वसूल करीत आहेत.
.....लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा तपास पोलिस ठाण्यातील पोलीस शिपाई वगळता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पन्नासहून अधिक गुन्हे निर्गती करिता देण्यात आले आहेत. वरिष्ठांनी या गुन्ह्यांचे निर्गती करण्याचा रेटा सुरू केल्याने अधिकारी व कर्मचारी व्यस्त झाले आहेत. त्यातच मास्क कारवाईमुळे त्यांना खऱ्या पोलिसिंगवर भर देता येत नसल्याचे दिसून येत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर
गंभीर गुन्ह्यातील तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. त्यामुळे जामिनावर जेल मधून सुटलेल्या आरोपींकडून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बरेच गुन्हेगार हे गुन्हे घडविण्याकरिता वय वर्षे १८ खालील मुलांचा वापर करत आहेत. अशावेळी पोलिसांना अल्पवयीन मुलांवर कारवाई करताना अडचणी येत आहेत.
.......पुणे शहरातील काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सुट्टीवर आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवत असून वरिष्ठांकडून मिळालेले ' टार्गेट ' पूर्ण करण्याच्या खटापटीत नाकाच्या खाली थोडा जरी मास्क आला तरी कारवाई अटळ आहे.यातून काही नागरिक मास्क कारवाईवरून पोलिसांशी हुज्जत घालताना दिसून येत आहेत. तर काही नागरिक दंड कमी करण्यासाठी पोलिसांकडे विनवणी करतात, तर काहीजण डोळ्यातून अश्रु काढून दंड माफ करा म्हणतात. ........
नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे..
पोलीस करीत असलेल्या मास्क कारवाई बद्दल नागरिकांत पोलिसांबद्दल रोष निर्माण होत असला तरी स्वतःच्या सुरक्षेसाठी व इतरांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. पोलीस बांधव व महापालिका प्रशासन हे आपल्या आरोग्यासाठीच विविध प्रकारे जनजागृती तसेच कारवाईच्या माध्यमातून सर्वांनी मास्क वापरावा यासाठी प्रयत्न करीत आहे, हे नागरिकांनीही लक्षात घेऊन खबरदारी घ्यायला हवी.