पुणे : कोथरूड डेपो परिसरातील एनडीए पुलामुळे (चांदणी चौक) गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. पुण्याहून हिंजवडी, बाणेर, मुळशीला जाण्यासाठी या चौकातूनच ये-जा करावी लागते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पुलाखालील रस्ता बॉटल नेक होत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या वाहतूक काेंडीत अडकले अन् महिनाभरात पूल पाडला गेला. दि. २६ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर या १ महिना ५ दिवसांच्या कालावधीनंतर अखेर रविवारी (दि. २) पहाटे २ च्या सुमारास हा पूल पाडण्यात आला.
पूल पाडण्यासाठी दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मि.मी. व्यासाचे १३०० छिद्र पाडले होते. त्यात ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला. १ हजार ३५० डिटोनेटरचा उपयोग नियंत्रित पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी केला. तरीही पूल पूर्णपणे पडला नाही. यावरून जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर ताशेरे ओढले जाऊ लागले होते. परंतु त्यांनी पूल बांधकामात अपेक्षेपेक्षा जास्त स्टील वापरल्याचे कारण त्यांनी सांगितले. मनसेचे नेते वसंत मोरे यांनी सुद्धा पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचे कौतुक केले आहे. तसेच पुण्यातील जंगली महाराज रस्त्याची आठवण करून दिली आहे. भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली, तर पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी. व रस्त्यांची सर्व कामे जंगली महाराज रोडच्या ठेकेदाराला द्यावीत अशी शिफारस मी तरी नक्की करणार असल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.
मोरे म्हणाले, ६०० किलो स्फोटक ,१३५० होल आणि पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर पाडलेली कंपनी असे नियोजन करण्यात आले. तसेच गेल्या महिन्यापासून केंद्रीय मंत्री, खासदार, प्रदेश अध्यक्ष, पालकमंत्री, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांची रेलचेल आणि प्रचंड मोठी यंत्रणा असूनही पूल पूर्ण पाडू शकले नाहीत. यावरुन एक मात्र फिक्स की पुलाचा ठेकेदार किती भारी असेल. भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर, पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी व रस्त्यांची सर्व कामे जंगली महाराज रोडच्या ठेकेदाराला द्यावीत अशी शिफारस मी तरी नक्की करेल. असे त्यांनी सांगितले आहे.