हठयोगातील 'षटकर्म' क्रियांमधील एक क्रिया म्हणजे कपालभाती. प्राणायामात सगळ्यात फायदेशीर प्राणायाम म्हणजे कपालभाती असे मानले जाते. कपाल म्हणजे कपाळ आणि भाती म्हणजे ओजस्वी (तेजोमय). कपालभातीमुळे शरीर निरोगी तर राहतेच, पण आपल्या फुफ्फुसांना होणाऱ्या संसर्गाची शक्यताही यामुळे कमी होते. तसेच ॲलर्जीची तत्त्व/घटक शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. कपालभाती केल्याने वजनही कमी होते तसेच, आपल्या शारीरिक-मानसिक संतुलनासाठी देखील त्याचा फार उपयोग होतो.
कपालभाती कसे करावे?
- सर्वप्रथम सुखासन/ सिद्धासन/ वज्रासन/ पद्मासन यांपैकी कोणत्याही एका आसनात बसावे.
- पाठीचा कणा ताट असावा.
- हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून गुडघ्यावर ठेवावेत.
- आता एक दीर्घश्वास घ्यावा.
- वेगाने उच्छवास सोडावा.
- उच्छवास बाहेर सोडता सोडता पोट आत घ्यावे. ( जितके शक्य होईल तितकेच पोट आत घ्यावे) नाभीला आतल्या बाजूस ओढून घ्यावे.
- श्वास घेताना निष्कारण ताकद लावू नये. नैसर्गिक पद्धतीने श्वास घ्यावा.
- सुरुवातीला २० ते ३० वेळा ही कृती करा. नंतर हळूहळू यात वाढ करावी.
लक्षात ठेवा कपालभाती करताना पाठीचा कणा ताठ असणे गरजेचे आहे. तसेच, कपालभाती करण्यापूर्वी 'जलनेती' केल्यास वायूमार्ग मोकळा होतो, ज्यामुळे कपालभाती जास्त लाभदायक ठरते. कपालभातीनंतर शवासन करावे. त्यामुळे आपले मन प्रसन्न व शांत होते.
प्राणायामाचे फायदे:
- पित्त, ॲसिडिटी व कफ यांसारख्या समस्या दूर होतात.
- नियमित केल्याने श्वसननलिकेत असणारे अडथळे दूर होतात.
- फुफ्फुसांच्या क्षमतेत वाढ होते.
- बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
- पोटाच्या स्नायूंना कपालभातीमुळे उत्तम व्यायाम मिळतो. मधुमेहींना याचा फायदा होतो.
- मन शांत ठेवण्यास मदत होते.
- नियमित केल्यास त्वचा तेजस्वी होते व रक्तप्रवाह सुधारतो.
कपालभाती कुणी करू नये?
- उच्च रक्तदाब व हृदयविकार असलेल्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा
- हार्निया, अल्सर असलेल्या व्यक्तींनी याचा सराव करू नये.
- पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास करू नये.
- मासिक पाळी सुरू असताना तसेच गरोदर महिलांनी कपालभाती करू नये.
-------
पूजा यादव, योग अभ्यासक