इंदापूर: शहरातील प्रत्येक नागरिक व प्रत्येक कुटुंब हे माझे कुटुंब आहे. त्यांचे आरोग्य कायम सदृढ राहण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून अद्यावत योग भवन उभारण्यात येईल अशी ग्वाही इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिली.
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे, तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांचे हस्ते भारत स्वाभिमान ट्रस्ट संजीवन योग सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय अनपट, मदन चव्हाण, माया विंचू व राजश्री शिंदे या योगगुरूंचा विशेष सन्मान सोहळा इंदापूर शहरातील बायोडायव्हर्सिटी येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
नगराध्यक्षा शहा म्हणाल्या की, प्रत्येकाने दररोज न चुकता कमीत कमी अर्धा तास तरी प्राणायाम, योगासने करणे अत्यंत जरुरीचे आहे. ही काळाची गरज आहे. यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. आपण जर सुदृढ राहिलो तर आपल्या घरातील सर्व कुटुंब सुदृढ राहतील. निरोगी राहतील त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन संपूर्ण कुटुंब आनंदी राहील.
योग सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय अनपट म्हणाले की, माणसाने जर रोज योगासने केली. तर त्यामुळे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. त्यामुळे आपण सुदृढ राहतो, त्यामुळे माणूस हा आजारी पडत नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मनोधैर्य सुद्धा उंचावते. म्हणून रोज योगासने करणे शहरी व ग्रामीण जीवन जगत असताना, अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी योग करण्यावर भर द्यावा.