वक्र म्हणजे वाकडा. या आसनात पाठीच्या कण्याचे ताकद समजते. कणा मजबूत होतो. डायबेटिक, किडनी, मूत्रपिंडांचे विकार बरे होण्यास मदत मिळते. पोटावरील चरबी कमी होते. मेरूदंडाची लवचिकता वाढते. ज्यांना पोटाचे विकार आहेत, त्यांनी हे आसन करू नये. स्लिप डिस्कमध्ये हे आसन टाळावे. हर्निया असेल तर हे आसन करू नये. पाठीचा कणा एका पातळीत राहून पिळला जातो. त्याची लवचिकता वाढते. पोटालाही पीळ पडतो व अंतरेंद्रियांवर दाब व ताण येतो. मज्जासंस्थेची कार्यक्षमता वाढते.
——————————————
वज्रासन :
वज्र म्हणजे इंद्राचे अस्त्र. या आसनामध्ये पायाची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते. म्हणून याला वज्रासन म्हणतात. योगासनासाठी शांत, एकाग्र मानिसक स्थिती आणि शारीरिक स्थिती या आसनातून मिळते. ओटीपोटीतील रक्ताभिसरण सुधारते. पचनसंस्था चांगली होते. जेवल्यानंतर १० मिनिटे हे आसन केल्यास लाभ होतो. पाठीच्या कण्यातील दोष नाहीसे होतात. श्वसनेंद्रिये मोकळी करण्यासाठी व ध्यानधारणेसाठी याचा विशेष उपयोग होतो.
————————-
पश्चिमोत्तानासन :
हे योगासनातील एक प्रमुख आसन मानले जाते. दोन्ही पाय पुढे, हात सरळ व पायांचे अंगठे दोन्ही हातांनी धरावे. पुढे वाकावे. कपाळ गुडघ्यांना टेकवावे व दोन्ही कोपर दोन्ही पायांच्या बाजूंना जमिनीवर टेकवावेत. गुडघे ताठ असावेत व टाचा, पोटऱ्या, मांड्या जमिनीला टेकलेल्या राहाव्यात. श्वसन संथपणे करावे. या आसनात पायापासून मानेपर्यंत सर्व शिरांना ताण बसतो. सर्व स्नायू आकुंचन पावल्याने फुप्फुसे, उदरस्थ इंद्रिये व अंतः स्रावी ग्रंथी यांवर ताण पडतो व त्यामुळे कार्यक्षमता वाढते. पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग व पचनेंद्रियांच्या तक्रारींवर हे आसन म्हणजे योग्य उपाय आहे. आध्यात्मिक दृष्ट्या कुंडलिनी जागृतीसाठी या आसनाचा अभ्यास केला जातो.
————————————
शशांकासन
हे आसन करताना चंद्राची शीतलता अनुभवायला मिळते तर आकार सशाप्रमाणे दिसतो. पाठदुखी कमी होते तसंच पोटावरची चरबी कमी होण्यासही मदत होते. सुरुवातीला वज्रासनामध्ये बसावं. या आसनाने पाठीला खूप चांगला ताण मिळतो. पाठदुखीमध्ये फायदेशीर आहे. पाठीप्रमाणे पोट आणि कंबर येथील भागांना चांगला ताण मिळतो. पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते.
आसनात पाठीला स्ट्रेच देता येईल तितके स्ट्रेच द्यावे. या स्थितीत डोळे बंद करावे व काही सेकंद या स्थितीत राहावे. शरीराला वरती आणताना घाई करू नये. हळुवारपणे अलगदपणे दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवावेत. ज्या व्यक्तींना तीव्र गुडघेदुखी, उच्च रक्तदाबाचा त्रास, व्हर्टिगो असेल त्यांनी आसन करू नये.
———————
पादहस्तासन
उभे राहून हे आसन केले जाते. प्रथम सरळ ताठ उभं राहावं. दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवावं. आता श्वास घेत हळुवारपणे दोन्ही हात वरती घ्यावे. आणि श्वास सोडताना दोन्ही हात खाली आणावे. हातांचे पंजे पायाला स्पर्श करावेत किंवा पायांच्या खाली ठेवावे. आता कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत दहा सेकंद थांबावं. सुरुवातीस काही जणांचा हात पायाला लागणार नाही तर काहींचे कपाळ गुडघ्याला. पण नित्य सरावाने तुम्ही हे करू शकाल. पोटाचे विकार दूर होतात. पोटाचे व पाठीचे स्नायू मजबूत होतात. पाठीच्या कण्याचा आजार असेल तर करू नये.
———————-
वृक्षासन :
शरीराची स्थिती वृक्षासारखी दिसते म्हणून याला वृक्षासन म्हणतात. हे आसन केल्याने एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते. मानसिक स्थैर्य, संतुलन राखणे यासाठी आसनाचा उपयोग होतो. शरीराची तोल सांभाळणारी यंत्रणा, पावले, डोळे व कान ही यंत्रणा या आसनामुळे चांगली होते. भिंतीचा आधार घेऊन आसन करता येऊ शकते. व्हर्टिगो, चक्कर येत असल्यास हे आसन करू नये.
————————
स्वस्तिकासन
स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीमध्ये शुभ प्रतीक आहे. सहजसुलभ असे आसन आहे. पायाची रचना स्वस्तिकातील एकमेकांना छेदणाऱ्या रेषाप्रमाणे असते म्हणून याला स्वस्तिकासन म्हणतात. आसन केल्याने मन शांत होते, ध्यान करण्यासाठी उपयुक्त आहे. दीर्घअभ्यासामुळे पद्मासन, सिध्दासन या आसनाची पूर्वतयारी होते. गुडघे, घोटे यांचे सांधे मोकळे होतात. तेथील रक्तसंचय सुरळीत होतो. सांध्याचे स्नायूबंध ताणले गेल्याने रक्ताभिसरण सुधारते. कंबर व माकडहाडाजवळील ज्ञानतंतू कार्यक्षम बनतात. यामुळे पायांची घडी पक्की होऊन बैठकीला स्थैर्य येते. पाठ, मान आणि मस्तक एका रेषेमध्ये असावे. खांदे किंचित मागे असावेत. चेहरा प्रसन्न ठेवावा. डोळे मिटून घ्यावेत. तीव्र गुडघेदुखीमध्ये हे आसन करू नये.
——————————-
उत्तान मंडूकासन
‘उत्तान’चा अर्थ होतो ताणलेला आणि ‘मंडूक’चा अर्थ बेडूक. या आसनाच्या स्थितीत शरीराची स्थिती एखाद्या शरीर ताणलेल्या बेडकासारखी दिसते, म्हणून या आसनाला उत्तान-मंडूकासन असे म्हणतात.
सर्वप्रथम वज्रासनात बसून आसन करावे. या आसनामुळे खांदे आणि मान यांना ताण मिळतो. बसण्याची स्थिती सुधारते. पचनक्रिया सुरळीत होते. मांड्या, गुडघे यांना बळकटी मिळते. अस्थमा, चिंता, डोकेदुखी, निद्रानाश दूर होते. ज्यांना सांध्यांना दुखापत झाली आहे, त्यांनी आसन करू नये.