लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगसाधना अतिशय महत्त्वाची आहे. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक आजार दूर ठेवणे शक्य होते. तसेच सकारात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये नियमित योगसाधनेचे महत्त्व वाढीस लागले आहे. एकीकडे जिम संस्कृती फोफावत असताना दुसरीकडे योगसाधनेकडील कलही वाढू लागला आहे. योगाकडे कारकिर्दीचे एक नवे दालन म्हणूनही पाहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गेल्या वर्षीपासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. योगसाधनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था आदी ठिकाणी योगा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजिले जात आहेत. योगसाधनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याचे ताणतणावाचे जीवन, अनियमित जीवनशैली, स्पर्धेचे युग यातून शारीरिक आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी योगासने, प्राणायाम यांचा उपयोग होत असल्याचे मत तरुणांनी आणि योगशिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. योगासने, प्राणायाम आदींचे महत्त्व दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. त्यामुळे जिमऐवजी योगासनांच्या क्लासला जाणाऱ्या महिला, तरुण, बालकांची संख्या वाढू लागली आहे, असे मत योगशिक्षकांनी नोंदवले. आजकाल प्रत्येक व्यक्ती फिट राहण्यासाठी नवनवीन पर्याय शोधत आहे. शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी योग फायदेशीर आहे. दररोज योग केल्याने तणाव कमी होण्यासोबत एकाग्रता वाढते आणि जागरूकता येते. योगाभ्यास करताना श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केल्याने शरीराला फायदा होतो, असेही मत या वेळी नोंदवण्यात आले.भारत देशाची मोठी परंपरा म्हणजे योग आहे. आरोग्य समस्यांवर योगा हे रामबाण उपाय आहे. योग शब्दाचा शाब्दिक अर्थ संस्कृतमध्ये योक असा आहे. योग व व्यायामाचे मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. परदेशातही आजमितीस योगाचे महत्त्व पटले असून परदेशी नागरिक सद्य:स्थितीत योगाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. परदेशी नागरिकांचा योगबद्दलचा ओढा केनिया, शेअल्स, श्रीलंका या देशांमध्ये वाढला आहे. भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा सातासमुद्रापार पोहोचविण्याचे कार्य भारतातील अनेक योग संस्थांनी केले आहे. तशी योग्याची वृत्ती प्राणायाम नि आसनातून स्थिरावते. आता योगाचा अर्थ सकाळी कुठेतरी जाऊन आसने नि प्राणायाम करण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो संपूर्ण जीवनाशी निगडित झालेला आहे.-किर्ती काळकुंदळीकर, योगाशिक्षक
योगसाधनेकडे वाढतोय तरुणाईचा कल
By admin | Published: June 21, 2017 6:21 AM