पुणे : जनसंघापासून पक्षकार्यात असलेले योगेश गोगावले यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे़ तसेच, पुण्यातील खासदार अमर साबळे, बाळासाहेब गावडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, तर उमा खापरे आणि धीरज घाटे यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती केली आहे़ आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे प्रदेश युवा मोर्चा अध्यक्षपद दिले आहे़ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी बुधवारी मुंबईत महाराष्ट्र भाजपाची प्रदेश पदाधिकाऱ्यांची यादी घोषित केली़ ही निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे़ गोगावले हे संघ स्वयंसेवक असून, पतित पावन संघटनेतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली़ १९८५ ते १९९२ या काळात ते महापालिकेचे सभासद होते़ २००९ मध्ये भाजपा शहर सरचिटणीस, २०११ मध्ये प्रदेश चिटणीस म्हणून त्यांनी काम केले आहे़ खासदार अनिल शिरोळे यांच्याकडून ते उद्या गुरुवारी सकाळी शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत़ पाच वर्षांची प्रतीक्षाशहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे बहुमत योगेश गोगावले यांच्या पाठीशी होते़ पण, राष्ट्रीय पातळीवरील पक्षांतर्गत राजकारणात त्यांना बाजूला सारले गेले़ त्यानंतर पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर योगेश गोगावले यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडली आहे़ भारतीय जनता पक्षात दर तीन वर्षांनी पदाधिकाऱ्यांची निवड होते़ त्यानंतर २०११ मध्ये शहराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती़ केंद्रातून निरीक्षक म्हणून व्यंकय्या नायडू हे कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी आले होते़ त्या वेळी कार्यकर्त्यांचे पाठबळ व गोपीनाथ मुंडे यांचे समर्थन योगेश गोगावले यांच्या पाठीशी होते़ मात्र, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील पक्षांतर्गत वादाचा परिणाम गोगावले यांना बसला़ प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी पुणे शहराध्यक्षपदी विकास मठकरी यांची नियुक्ती जाहीर केली़ मुंबई प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळीही आपल्या मताचा आदर न केल्याने दुखावलेल्या मुंडे यांना हा धक्का होता़ त्यांनी जाहीरपणे पक्ष सोडण्याची घोषणा करून भाजपामध्ये स्फोट घडविला होता़ त्या वेळी पुणे भाजपावर मुंडेसमर्थकांचे वर्चस्व होते़ आपल्या पाठीराख्यांसाठी अगदी टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत जाण्याची मुंडे यांच्या पद्धतीमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती़ केंद्रीय नेत्यांनी मुंडे यांची समजूत काढली, तरी पुणे शहर भाजपामध्ये उभी फूट पडल्यासारखे चित्र निर्माण झाले होते़ दोन्ही गट एकमेकांच्या कार्यक्रमाला जात नसल्याचे चित्र दिसत होते़ जवळपास १० महिने हे चित्र होते़ शेवटी योगेश गोगावले यांची मार्च २०१२ मध्ये प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करुन या वादावर पडदा टाकण्यात आला़ ३ वर्षांनंतर मुंडे समर्थक अनिल शिरोळे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली़ अनिल शिरोळे हे खासदार झाल्याने आता हे पद योगेश गोगावले यांच्याकडे आले़ सहिष्णुतावाढीसाठी प्रयत्न करणारपुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे़ पुण्यातील सहिष्णुता, खिळाडूवृत्ती वाढावी, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत़ केंद्र व राज्य शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व पक्षांना बरोबर घेऊन वाढत्या विकासाच्या दृष्टीने काम करायचे आहे़ सत्तारूढ पक्षाचा शहराध्यक्ष या नात्याने पुण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन पुण्याचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार. योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजपा
भाजपा शहराध्यक्षपदी योगेश गोगावले
By admin | Published: March 31, 2016 3:03 AM