पुणे : हृदयविकार किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे हृदय बंद पडल्यास तातडीचे प्राथमिक उपचार रुग्णांच्या आयुष्यासाठी संजीवनी ठरतात. पण अद्यापही नागरिकांमध्ये याबाबतीत पुरेशी जनजागृती नाही. त्यामुळे अचानक हृदय बंद पडलेल्या व्यक्तींना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागतात.
याबाबत जनजागृतीसाठी आता जागतिक पातळीवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना बंद पडलेले हृदय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जगभरात धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अचानक हृदयक्रिया बंद पडून अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशा व्यक्तीचे प्राण फक्त डॉक्टरच नव्हे, तर बघ्याची भूमिका घेणारे सर्व जण वाचवू शकतात. संबंधित व्यक्तीला रुग्णालयात वैद्यकीय मदत मिळेपर्यंत अमूल्य वेळ वाया जातो व रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता कमी होते. त्याला घटनास्थळीच तत्काळ हृदयक्रिया सुरू करण्याची मदत मिळाल्यास एक अनमोल जीव वाचू शकतो. ही मदत म्हणजेच ‘बेसिक कार्डियाक लाईफ सपोर्ट’ अर्थात जीवन संजीवनी होय.
सर्वसामान्य माणसाला या जीवन संजीवनी म्हणजे प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्याकरिता जगभरात पहिल्यांदाच दि. १६ आॅक्टोबर हा दिवस ‘वर्ल्ड रिस्टार्ट अ हार्ट डे’ म्हणून साजरा केला जात आहे.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत कोकणे म्हणाले, की हृदय बंद पडल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत प्राथमिक उपचार मिळाल्यास अनेक रुग्णांचा जीव वाचतो. असे अनेक रुग्ण आता सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत आहेत.
हे उपचार जितक्या लवकर आणि योग्य पद्धतीने मिळतात, तेवढे संबंधित व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता जास्त असते. हे उपचार न मिळाल्यास रुग्णालयात येईपर्यंतचा बहुमूल्य वेळ वाया जातो.
त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी प्राथमिक उपचारांबाबत जनजागृती वाढण्याची गरज आहे.