लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भांडणे सुरू असल्याचा कॉल मिळाल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तुम्ही पोलीस नेहमी उशिरा येता, असे म्हणत एका दाम्पत्याने धक्काबुक्की केली.
याप्रकरणी पोलिसांनी शंकर पोटे (वय ३०, रा. आंबेडकरनगर मार्केटयार्ड) याच्यासह पत्नीवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी चंद्रकांत बालाजी केंद्रे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मार्केट यार्डमधील आंबेकरनगर येथील गल्ली नं. ३ मध्ये मंगळवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.
फिर्यादी केंद्रे हे मंगळवारी त्यांचे सहकारी धालपे यांच्यासोबत दिवसपाळी मार्शल ड्युटीवर होते. त्यावेळी मुख्य नियंत्रण कक्षाकडून मार्केट यार्ड येथील आंबेडकरनगरमधील गल्ली क्रमांक तीन येथे भांडण सुरू असल्याचा काॅल मिळाला होता. त्यानुसार दोघे मदतीसाठी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा शंकर पोटे याने तुम्ही पोलीस नेहमी उशिरा येता. आमचा जीव गेल्यानंतर तुम्ही येणार का, असे म्हणत केंद्रे यांच्या अंगावर धावून जात, शर्टची गचांडी धरून धक्काबुकी केली. तसेच पोटे याच्या पत्नीने देखील केंद्रे यांना धक्काबुक्की करून, त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानुसार केंद्रे यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात पोटे दाम्पत्यांविरुद्ध तक्रार दिली.
सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके अधिक तपास करीत आहेत.