Ladki Bahin Yojana: तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला; पण पैसे नाही आले, मग काय कराल?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 02:55 PM2024-08-18T14:55:03+5:302024-08-18T14:56:44+5:30
सध्या १ कोटी ५ लाख महिलांच्या बँक खात्यावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा झाले आहेत
राहुल गणगे
पुणे: राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजना सुरू केली. या अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये याप्रमाणे जुलै व ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास १५ ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे आपल्या खात्यात पैसे आले की नाही, हे पाहण्यासाठी आणि बँक खात्याला आधार लिंक करण्यासाठी लाडक्या बहिणींची विविध बँकांमध्ये झुंबड उडाली आहे. खात्यात पैसे जमा झाले त्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत हाेता. खात्यात पैसे आले अन् जुमला नसल्याची खात्री झाली, अशी भावना काही लाडक्या बहिणींनी व्यक्त केली.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेत खरंच पैसे येतील का? असा संभ्रम असल्याने अनेक महिलांनी अर्ज केला नव्हता; मात्र आता अर्ज केलेल्या इतर महिलांच्या खात्यात रक्कम आल्याचे पाहून आपली राहिलेली नोंदणी करण्यासाठी बँकेकडे धाव घेतली आहे; परंतु ही योजना यापुढेही कार्यरत राहणार आहे. तसेच ज्या नागरिकांनी अर्ज केले आहेत; तसेच ज्यांचे बँक खात्याशी आधार लिंक आहे, त्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली.
तुम्ही अर्ज केला; पण पैसे नाही आले, मग काय कराल?
- तुम्ही नारीशक्ती ॲप किंवा लाडकी बहीण योजना पोर्टलवरून अर्ज केला आहे. तो मंजूर झाला आहे; पण पैसे बँक खात्यात जमा झाले नसतील तर आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक केले आहे का? हे तपासावे.
- आपल्या मोबाइलवर अर्जातील त्रुटींबाबत काही मेसेज आला आहे का, हे पाहावे.
- त्रुटींची पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करावा.
- आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झालेत का? ते तपासावे.
अर्ज अजूनही पेंडिंग का?
- लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया जाेरात सुरू आहे. जसजसे लाभार्थ्यांचे अर्ज महिला व बालकल्याण विभागाकडे जमा होत आहेत, तसतसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे. पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी बँक तसेच अर्ज भरलेल्या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अर्ज तपासा; लाभ मिळेल!
- ज्या महिलांनी नारीशक्ती ॲपवर अर्ज भरले आहेत, त्यांना अर्जातील त्रुटींची माहिती देण्यात आली आहे. तो अर्ज लाभार्थ्यांना पुन्हा भरता येणार आहे. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करा. अर्ज अगोदरच ॲप्रूव्ह झाला असेल तर काहीही करू नये. बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.
घरोघरी राबविली जाणार मोहीम
आजपर्यंत १ कोटी ५ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले आहेत. जे लाभार्थी अद्याप या योजनेपासून वंचित आहेत त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी मोहीम राबवून त्यांचे अर्ज भरून तसेच अपूर्ण अर्ज भरण्यात येणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी शांततेत आधार लिंक तसेच केवायसी करून घ्यावे. याबाबत पुणे शहरासह जिल्ह्यातील बँक व्यवस्थापकांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.
बँक खाते उघडताय, एजंटांना बळी पडू नका!
सध्या लाडकी बहीण योजनेसाठी महिला बँक खाते उघडण्यासाठी बँकेत गर्दी करत आहेत. याचा फायदा घेत एजंटांकडून काही ठिकाणी महिलांकडून पैसे उकळले जात असल्याचे महिलांकडून सांगण्यात येत आहे; परंतु बँक खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांत किमान ५०० ते १००० रुपये रक्कम ठेवणे गरजेचे आहे. तसेच अनेक बँकांत शून्य बॅलन्स खातेही उघडण्यात येत आहे. त्यामुळे महिलांनी एजंटांना पैसे न देता थेट बँकेत जाऊन खाते उघडावे.
सध्या १ कोटी ५ लाख महिलांच्या बँक खात्यावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा केले आहेत. ही योजना यापुढेही विस्तारित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी, गडबड न करता अर्ज भरावेत. तसेच सरकारकडून मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. - जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग