पुणे : तुमचे म्हणणे, तुमच्या मागण्या एकदम रास्त आहेत, मला विषय समजला, मात्र यासंबधी सरकारमध्ये जे कोणी अधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर बोलावे लागेल. कोकण दौरा संपला की त्यांच्याशी बोलणी करतो व तुम्हाला कळवतो, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील रिक्षाचालकांना सांगितले.
बाइक टॅक्सीविरोधात शहरातील सर्व रिक्षाचालकांनी सोमवारी बंद पुकारला होता. त्याची दखल घेत राज ठाकरे यांनी रिक्षाचालकांबरोबर बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला. या वाट बघतोय रिक्षावाला संघटनेचे डॉ. केशव क्षीरसागर, आम आदमी रिक्षा संघटनेचे केदार ढमाले, शिवनेरी रिक्षाचे अशोक साळेकर तसेच मनसेचे किशोर चिंतामणी उपस्थित होते.
सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांना बाइक टॅक्सीमुळे त्यांच्या व्यवसायावर आलेल्या संकटाची माहिती दिली. बाइक टॅक्सी हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर आहे, प्रवाशाच्या सुरक्षेची त्यात कोणतीही गोष्ट नाही, पोलिसांच्या संगनमताने काहीजण या बेकायदेशीर व्यवसायात उतरले आहेत, वाहन चालवण्याचा परवाना वगैरे काहीही त्यांच्याकडे नसतो, किती पैसे घ्यायचे वगैरेचे काहीही नियम नाहीत, मुळातच बेकायदेशीर असलेल्या या व्यवसायामुळे प्रामाणिकपणे कायद्याचे पालन करून रिक्षा चालवणाऱ्या तरुणांसमोर बेरोजगारीचे संकट आल्याचे त्यांनी सांगितले.
ठाकरे यांनी त्यांच्याकडून विषय समजावून घेतला. त्यानंतर त्यांनी तुमचे म्हणणे व मागणी दोन्हीही रास्त असल्याचा दिलासा दिला. मात्र सरकारमध्ये या विषयाशी संबधित मंत्री, अधिकारी यांच्याबरोबर बोलावे लागेल. त्यांना सांगावे लागले. ते नक्की करेन, कोकण दौरा संपला की त्यांची भेट घेऊन या विषयावर तोडगा काढू, असे आश्वासन ठाकरे यांनी रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.