पुणे: तुम्ही आदरणीय, वंदनीय आहात, पण आम्ही नक्की केले तरी काय? गरीब कष्टकरी महिलांना आर्थिक मदत देणे चूक आहे का? लोकसभेतील पराभवानंतर आम्ही कधी मतदान यंत्रांबद्दल बोललो नाही, मग आता ज्यांचा पराभव झाला ते बोलत असतील तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उत्तर दिले आहे, ते तरी मान्य करणार की नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी डॉ. बाबा आढाव यांची उपोषणस्थळी भेट घेत सरकारच्या योजनांचे समर्थन करत निवडणूक यंत्रणेत काहीही घोटाळा वगैरे नसल्याचे जाहीरपणे सांगितले.
निवडणूकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, मतदान यंत्रामध्ये काही घोटाळा आहे, केंद्र सरकार कोणत्याही चर्चेला संसदेत तयार होत नाही, लोकशाही मुल्यांची घसरण सुरू आहे असे आरोप करत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. त्याचा शनिवारी तिसरा दिवस होता. अजित पवार यांनी शनिवारी दुपारी डॉ. आढाव यांची उपोषण स्थळी येऊन भेट घेतली. एक नागरिक, एक कार्यकर्ता व काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी या नात्याने आपण इथे आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पवार यांनी डॉ. आढाव यांच्या सर्व आक्षेपांना तिथेच जाहीरपणे उत्तरे दिली. ते म्हणाले,“ लोकसभेला आमचा पराभव झाला. त्यावेळी मीच काहीतरी आकर्षक योजना काढायला हवी असे सांगितले. शिवराजसिंह चौहान यांची लाडली बहिण योजना आमच्यासमोर होती. ती बजेटमध्ये बसत होती. त्यामुळे आम्ही जाहीर केली. यात २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना यात दरमहा १५०० रूपये मिळतात. यात वाईट काय आहे?
मतदान यंत्रांच्या विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने, ‘पराभव झाला की हरकत व जिंकलात की काहीच नाही’ असे उत्तर दिले. राज्यघटनेला आपण सगळे मानतो. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्यानुसार मान्य करायला हवा. केंद्र सरकार संसदेत चर्चा करायला तयार होत नाही. याबाबत दिल्लीत गेल्यावर संसदीय कामकाज मंत्री आहेत, त्यांची भेट घेऊन त्यांना याची कल्पना देईल असे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, “बाबा, मी नेहमीच तुमच्याबरोबर संपर्कात रहात असतो. आंदोलन करण्याचा तुमचा अधिकार मला मान्य आहे, पण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना याही वैयक्तीक लाभ देणाऱ्याच योजना आहेत, त्यामुळे आमच्या योजनेत गैर काहीही नाही.”
अजित पवार यांनी जाहीरपणे त्यांच्या मित्रपक्षांना त्यांची बटेंगे ते कटेंगे, एक है ते सेफ है या घोषणा मान्य नसल्याचे सांगितले याबद्दल डॉ. आढाव यांनी त्यांचे कौतूक केले. तुमचे पुरोगामी धोरण तुम्ही सोडलेले नाही हे यातून तसेच आंदोलन, उपोषण याची दखल घेऊन आज तुम्ही भेट घ्यायला आला यातून दिसते असे डॉ. आढाव म्हणाले.