पुणे : मुख्यमंत्र्यांची भाषा ही धमक्यांची भाषा आहे. दसरा मेळावा असो नाहीतर मुलाखत असो, विरोधकांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. तुम्हाला जी कारवाई करायची ती करा. आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
महाविकास आघाडीच्या सरकारला १०० दिवस पूर्ण दिवस झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आघाडी सरकारच्या एक वर्षातील कामगिरीवर टीका केली. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून, या काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कोरोना काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना मदत मिळाली नाही. नियमित हप्ते भरणा-यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदानही मिळालेले नाही. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून, शिक्षणाचाही बट्ट्याबोळ केल्याचे पाटील म्हणाले.
‘अॅक्शन-रिअॅक्शन’मुळे जनेतेचे नुकसान
जयंत पाटील म्हणतात, चंपा म्हणाले तर बिघडले कुठे? तर, मग आम्हीही उद्धव ठाकरेंना ‘उठा’, शरद पवारांना ‘शपा’, जयंत पाटील यांना ‘जपा’ असे म्हणू शकतो. तुम्ही आम्हाला विशेषणे लावणार असाल तर आम्हालाही बोलता येते; परंतु ही राजकीय संस्कृती नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून यावर विचार करायला हवा. जनतेच्या विकासाठी राजकीय आचारसंहिता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले.