'तुम्ही साहेबांचे विश्वासू नेते; अचानक काय संकट आलं की...' रोहित पवारांचा वळसे पाटलांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 03:07 PM2023-07-07T15:07:06+5:302023-07-07T15:13:36+5:30
वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत घेतलेली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसाठी मोठा धक्का आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले म्हणून वळसे पाटील ओळखले जातात. त्यांनी असं पाऊल उचलणं अनपेक्षित असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. रोहित पवारांनी सुद्धा दिलीप वळसे पाटलांचा लेखाजोखा ट्विटर वर मांडून त्यांना प्रश्न विचारला आहे. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. असं रोहित पवार म्हणाले आहेत.
मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हत असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का? असा प्रश्न रोहित पवारांनी त्यांना केला आहे.
मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे… pic.twitter.com/Kg06T3C5Wp
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 6, 2023
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व वळसे पाटील यांचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर वळसे पाटील यांनी राजकारणात प्रवेश करून प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हापासून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले म्हणून वळसे पाटील ओळखले जातात. तीन वर्षांपूर्वी जेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी पवार यांचे मन वळविण्यात वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून वळसे पाटील यांनी अनेक ठिकाणी जबाबदारी पार पाडली आहे. राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.