पुणे : पुणे पोलीस मागील काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी काम करत आहेत. मात्र यासाठी आम्हाला अजून काम कारावे लागणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहेत यात काही शंका नाही. ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. त्यामुळे आमचे कान आणि डोळे बनून एकत्र काम करण्याचे आवाहन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
आशापुरा माता मंदिर आणि लोकमत तर्फे आयोजित नवदुर्गा पुरस्कार सोहळ्यावेळी बोलत होेते. राज्यातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, कोहिनूर समूहाचे कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ विधिज्ञ एस. के जैन,आशापुरा माता मंदिराचे ट्रस्टी विजय भंडारी, संपादक संजय आवटे, कल्याणी संभूस दर्डा आदी मान्यवर उपस्थित होते.
अमितेश कुमार पुढे म्हणाले की, महिलांची सुरक्षा हे पोलिसांसाठी प्राधान्याचा विषय आहे. समाजातील काही विशिष्ट नागरिक महिलांविरुद्ध अत्याचार करु पाहत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच समाज कंटकांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करण्याचे ध्येय महाराष्ट्र पोलिस दल आणि पुणे पोलिसांचे आहे. काही घटना घडल्या आहेत. यामध्ये बोपदेव घाटातील घटना असेल किंवा अन्य घटना यामध्ये पोलिस प्रशासन कडक कारवाई करणार आहेत. असे मत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी व्यक्त केले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महिलांवर सध्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे घरातील कामे एकवेळ मुलींना सांगू नका पण तिला स्वरक्षणासाठी सक्षम बनवा असा पवित्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच अनेक ग्रामीण भागत मुलींचे बालविवाह लावून दिले जातात ते देखील थांबवन महिलांच्याच हातात आहे. महिलांनी महिलांसाठी काम करण्याची गरज आहे.असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
संपादक संजय आवटे म्हणाले की, नवरात्र उत्सव साजरा होताना नवदुर्गा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सत्कार सोहळा हा महत्वाचं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पण कौतुकाची बाब म्हणजे ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर आहेत. त्यामुळे नवरात्रातील ही बाब महत्त्वाची आहे. नवदुर्गा देवी म्हणून स्त्रियांना मान सन्मान देण्यापेक्षा महिलांना आधी माणूस म्हणून वागणूक द्या. महिलांकडे पाहण्याची दृष्टी पुरुषांनी बदलायला हवी. महिलांना कायम घर आणि कामचा प्रश्न विचारला जातो मात्र पुरुषांना हा प्रश्न विचारला जात नाही. ही मानसिकता बदल्याची गरज आहे. आशापुरा माता मंदिरांच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या नवदुर्गा पुरस्कार सोहळ्यात मान्यवर आणि प्रख्यात महिलांचा सत्कार केला जातो, त्यांना त्यांच स्थान मिळालं पाहिजे यासाठी या कार्यक्रम महत्वाचा आहे.