लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्री पत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत सूट जाहीर केली आहे. यामुळेच सध्या या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिक दुय्यम निबंधक कार्यालयात प्रचंड गर्दी करत आहेत. परंतु मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार, दस्त निष्पादित केलेच्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात, त्यामुळे पक्षकारांनी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
शासनाने दिनांक २९ ऑगस्ट रोजी कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर, तसेच २९ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे भाडेपट्टा या दस्तऐवजावर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची १ च्या अनुच्छेद २५ च्या खंड (बी) व ३६ (iv) अन्वये अधिभारासह आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क १ सप्टेंबर २०२० पासून सुरु होणाऱ्या आणि दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणाऱ्या कालावधीकरिता २% तर दिनांक १ जानेवारी २०२१ पासून सुरु होणाऱ्या ३१ मार्च २०२१ रोजी संपणाऱ्या दीड टक्क्याने कमी केले आहे. तसेच महापालिका क्षेत्रात स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावरील अधिभार १ सप्टेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीकरिता अर्धा टक्के इतका कमी केलेला आहे. तसेच २८ ऑगस्ट २०२० रोजीचे शासन निर्णयान्वये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९५१ अन्वय स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारणारा एक टक्का अधिभार हा १ सप्टेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीकरिता शून्य टक्के तर १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२१ अर्धा टक्का केलेला आहे.
शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत दिनांक ३१ मार्च २०२१ अखेरपर्यंत असल्याने याचा लाभ घेण्याकरिता शहरातील एकूण सत्तावीस दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये उक्त सवलत संपत असल्याने गर्दी होत आहे. त्यामुळे गर्दी करू नये, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी केले आहे.