पुणे : शहरातील कुठल्याही रस्त्यांवर पडलेला खड्डा, समपातळीत नसलेले रस्ते, पाणी साचणारा भाग व खचलेले चेंबर आदी रस्त्यांच्या समस्यांबाबत महापालिकेच्या पथ विभागाकडे नागरिकांना थेट तक्रार करता येणार आहे. ही तक्रार प्राप्त झाल्यावर दोन दिवसात संबंधित ठिकाणचा खराब भाग दुरुस्त केला जाईल, असा दावा महापालिकेच्या पथ विभागाने केला आहे.
याबाबत पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, समान पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज विभागाची कामे आदी कामांसाठी महापालिकेच्या परवानगीने शहरात विविध ठिकाणी रस्ते खोदाई करण्यात आली होती. ही रस्ते दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येत असून, पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या केवळ रस्ते समपातळीत आणून, तेथील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत आहे. पावसाळ्यानंतरच रस्त्यांच्या पुनर्डांबरीकरण करण्यात येणार आहे.
सध्या होत असलेल्या खड्डे दुरुस्तीनंतर काही दिवसात त्यातील भर बाजूला पडतो अथवा तेथे उंचवटा तयार होतो. याचबरोबर चेंबरची झाकणे अनेक ठिकाणी खचली आहेत. त्यामुळे या तात्पुरत्या दुरुस्तीचा वाहनचालकांना त्रास होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील खड्ड्यांची माहिती नागरिकांना कळविता यावी. यासाठी दोन संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले असून, रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी कार्यालयीन वेळेत ०२०-२५५०१०८३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तर भरारी पथकाशी (रविवार वगळता) ९०४९२ ७१००३ या क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येणार आहे. या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे रस्त्याच्या दुरवस्थेचे फोटो, व्हिडीओ पाठविता येणार आहे. दरम्यान पीएमसी केअर ॲप व ट्विटर हँडलद्वारेही आलेल्या खड्ड्यांविषयक तक्रारींवर पथ विभागाकडून दोन दिवसात कार्यवाही केली जाईल असे दांडगे यांनी सांगितले.