पुणे : शेतकरी सरकारकडे भीक मागत नसून त्यांचे हक्काचे पैसे मागत आहेत. ते त्यांच्या विकलेल्या मालाचे पैसे सरकारी नियमानुसारच मागत आहेत. त्यामुळे ते नाकारण्याचा अधिकार सरकारला नाही. माेदी सरकारने नाेटबंदी केली तशी शेतकरी आता त्यांची वाेटबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा याेगेंद्र यादव यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाची एफआरपी मिळावी यासाठी पुण्यातील अलका टाॅकीज पासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढला. या माेर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्याबराेबरच याेगेंद्र यादव सहभागी झाले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. दुपारी 1.30 च्या सुमारास शेतकऱ्यांचा माेर्चा अलका टाॅकीज पासून साखर संकुलकडे काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील हजाराे शेतकरी या माेर्चात सहभागी झाले हाेते.
यादव म्हणाले, एफआरपीची रक्कम ही काही हजार काेटींची आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या या मागणीचा गांभिर्याने विचार केला पाहिजे. जर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा हमीभाव मिळत नसेल तर देशातील शेतकऱ्यांना कुठले अच्छे दिन दाखवणार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संघर्ष हा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा संघर्ष आहे. गेल्या 70 वर्षात काॅंग्रेस सरकारने शेतकऱ्यांना दवाखान्यात भरती करण्याची वेळ आणली हाेती. तर भाजप सरकारने त्यांना सामान्य वार्डातून अतिदक्षता विभागात पाेहचवण्याची तयारी केली आहे. शेतकऱ्यांना एफ आर पी देण्यामागे सरकारचा राजकीय स्वार्थ असून निम्मे कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आहेत तर निम्मे भाजप नेत्यांचे आहेत. त्यामुळे ते त्यांच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. अशा सरकारला आता घरी पाठवण्याची वेळ आली आहे.