पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अनेकदा वादात सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मतदारांशी बोलताना डोक्यावर बर्फ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ‘मी सकाळी उठल्यावर चिडायचे नाही, आवाज वाढवायचा नाही’, असे स्वतःला बजावत असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही मतदारांशी बोलताना सत्तेचा दर्प येणार नाही याची याचे भान ठेवावे,’ असा वडीलकीचा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला. वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजीही कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.
पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, धीरज घाटे, दीपक मानकर, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.
निवडणुकीत पुण्यातील मतदारांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे महायुतीतील सहकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असून रुसवे फुगवे दूर करून विरोधकांना धूळ चारावी. मतदारांची स्मरणशक्ती छोटी असल्याने मोदी यांनी केलेले काम मतदारांना पुन्हा सांगावे लागणार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी कोणतेही हेवेदावे न बाळगता कामाला लागावे. लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम असल्याचेही त्यांनी सांगितले.
विरोधक सध्या मतदारांच्या मनात शंकाकुशंका निर्माण करण्याचे काम करत आहेत. कोणताही उमेदवार कमकुवत नसून मतदार राजा कोण निवडून येईल हे ठरवतो. केवळ विरोधासाठी विरोध केल्यास विकास होत नाही ही पुणेकरांना पटवून द्यावे लागेल. कार्यकर्त्यांनी एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे जाऊया असे सांगून कार्यकर्त्यांनी वादग्रस्त कृती किंवा वक्तव्य टाळावे. मतदारांशी बोलताना उमेदवाराची मते घटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. एखादा मतदार मत देणार नाही, असे सांगत असल्यास त्याला विरोध करू नये. मतदाराला मत देण्याचा अधिकार असून आपल्याला मत मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा मतदाराला विरोध करून मत नाही दिले तर गेला उडत, अशी भूमिका ठेवल्यास तुम्ही राहाल तिथेच राहाल; पण उमेदवार मात्र उडून जाईल, अशी भीती पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
गमतीचा भाग सोडल्यास लोकांशी नम्रतेने वागा. केंद्र व राज्यात आपले सरकार आहे, त्यामुळे आपल्याला सत्तेचा दर्प येणार नाही, याची काळजी घ्यावी. शेवटच्या कार्यकर्त्यांनी तसेच व्यासपीठावरील सर्वांनी याचे भान ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.