पुणे: काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची घर फोडण्याची मोठी परंपरा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घर फोडल्यामुळे भाजपला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं आहे असं विधान केलं होत. त्यावर पाटलांनी प्रत्युत्तर दिल आहे. तसेच तुम्ही आमच्या उद्धवजींना पळवलं असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
नाना पटोले यांना टोला लगावत पाटील म्हणाले, उद्धवजी आणि आमचं गुण्यागोविंदाने चाललं होतं. तुम्ही त्यांना फितवलं, पळवलं, उद्धवजींची शिवसेना रोज उठून गद्दारी केली म्हणत आहेत. तुम्ही २०१९ ला काय केले. तुम्ही गद्दारीच केली ना, राष्ट्रवादी म्हणत आहे. यांनी यांची माणसं पळवली. आम्ही सर्वजण सहनशील आहोत म्हणजे भित्रे नाही. घर कोणी कोणाची फोडली, गद्दारी कोणी केली, पाठीत खंजीर कोणी खुपसला. यावर वेगळी पत्रकार परिषद घेण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.
अजित पवारांचा एक प्रॉब्लेम
अजित पवार मला काय म्हणतात मला घेणे नाही. लोक मात्र माझ्या बाबतीत, शांत आहे संयमी आहे, चांगले बोलतात. अंगावर धावून येत नाहीत, कामे करतात असे बोलतात ते महत्वाचे आहे. अजित पवारांचा एक प्रॉब्लेम आहे, स्वतः वर झालेला अन्याय त्यांना व्यक्त करता येत नाही. त्यामुळे ते सांकेतिक अशी काहीतरी बडबड करत राहतात.
आतापर्यंत कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही
कसबा - चिंचवड पोटनिवडणुकीबाबत बोलताना पाटील म्हणले, येत्या ६ फेब्रुवारीला उमेदवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यावेळी आम्ही अर्ज दाखल करणार आहोत. आतापर्यंत कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही. मात्र आज रात्री उशिरा नावे जाहिर होतील. कसबा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजता आणि चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज १ वाजता भरला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.