लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना महामारीने रिक्षाचालकांचा व्यवसाय मोडून पडला पण त्यांच्यातील बंधूभाव कायम राहिला. त्यामुळेच मिळालेली मदत सर्वांमध्ये वाटून घेण्याचा निर्णय झाला व एक आदर्शच त्यामधून तयार झाला.
खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्या मानधनातून रिक्षाचालकांंना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे १९ संघटनांच्या काही गरजू सदस्यांंना मदत केली. आप रिक्षा संघटनेला यात ३७ हजार ५०० रुपये मिळाले. बापट यांंनी सांगितले त्याप्रमाणे गरजवंत रिक्षाचालकाला ते मिळाले असते. पण दीड हजार रुपये रुपये औषधातच खर्च झाले असते. शिधा आणला असता तर तोही ५० रुपये किलो ज्वारी, ३५ रुपये गहू असा महाग आणावा लागला असता व पैसे लगेच संपले असते.
त्यामुळेच संघटनेने वेगळा निर्णय घेत बापट यांच्या मदतीत आणखी ३८ हजार रुपयांची भर घातली. या रकमेतून संघटना आता थेट शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करणार आहे. तीही संघटनेच्याच शेतकरी सदस्यांकडून गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ अशी शिधा खरेदी या रकमेतून केली जाणार आहे.
हे धान्य संघटनेच्या ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या, ओढग्रस्त किंवा कोरोना वा अन्य असाध्य आजार असलेल्यांना देण्यात येणार आहे. “पैसे वाटप केले तर ते असेच संपले असते. शिवाय मोजक्या काही जणांंनाच देता आले असते. त्यामुळेच सामूहिक स्वरूपात मदत वाटून घेण्याचे ठरवले. त्याला सर्वांची संमती मिळाली, आता लवकरच याची कार्यवाही केली जाईल,” असे संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी सांगितले.