तुम्ही कामाला लागा, मी महाविकास आघाडीकडून जागा मिळवतोच; अजित पवारांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 06:43 PM2023-02-02T18:43:51+5:302023-02-02T18:44:02+5:30
काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुखांबरोबर आपण बोलू अन् जिंकूच
पुणे : आपली तिथे ताकद आहेच. तुमचे म्हणणे योग्य आहे. तुम्ही कामाला लागा, महाविकास आघाडीकडून जागा मी मिळवतो असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंचवडमधील पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना सांगितले. गुरूवारी दुपारी त्यांनी पुण्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
भारतीय जनता पक्षाचे तेथील आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे तिथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड शाखेने ही निवडणूक लढवायची असा रितसर ठरावच केला असून तो पक्षाकडे दिला आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून त्यांनी यापुर्वी तिथून निवडणूक लढवली आहे, मात्र आघाडीत अजून ही जागा लढवण्याबाबत एकमत झालेले नाही. त्यातच निवडणूक बिनविरोध करावी यासाठी भाजपने आवाहन केले आहे.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते ही जागा लढवण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळे पवार यांनी गुरूवारी तेथील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यापुर्वीच्या निवडणूकीची त्यांनी माहिती घेतली. इच्छुक उमेदवारांबरोबर पवार वैयक्तीक बोलले. गव्हाणे यांनी त्यांना मतदारसंघाची माहिती दिली. आपली राजकीय ताकद या मतदारसंघात चांगली आहे. गेली अनेक वर्षे तिथे आपण काम केले आहे असे त्यांनी सांगितले. पवार यांनी त्यांना, तुमचे म्हणणे मान्य आहे. तुम्ही कामाला सुरूवात करा. काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुखांबरोबर आपण बोलू, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वालाही बोलायला सांगू, जागा आपल्याला नक्की मिळेल व आपण ती जिंकूच असे सांगितले.