इंदापूर : परीक्षेला बसताना सोबत सॅक ठेवण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून परीक्षा अधिकाऱ्याला कानाखाली मारल्याची घटना इंदापूरच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात घडली आहे. याबाबत इंदापूर पोलिसांनी विद्यार्थ्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि.१५ जुलै रोजी दुपारी २ ते ५:४५ या वेळेत विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयाचा लेखी पेपर होता. परिक्षार्थी विद्यार्थ्यांना परिक्षा हाॅलमध्ये सॅक किंवा इतर कोणतीही वस्तु घेवुन येण्यास मनाई करण्यात आली होती. असे असताना विज्ञान शाखेतील एक परिक्षार्थी विद्यार्थी काळ्या रंगाची सॅक घेऊन आला. त्याला संबंधित परीक्षा अधिकारी यांनी सॅक परिक्षा हाॅलच्या बाहेर ठेवण्यास सांगितले. त्यावेळी सदर विद्यार्थ्याने परीक्षा अधिकारी यांच्याशी आरेरावीची भाषा करून सॅक वर्गात घेऊन जाणार असे बोलून सॅक वर्गात घेऊन गेला.
दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास परीक्षा अधिकारी हे परिक्षा हाॅलमधुन हजेरी रिपोर्ट परीक्षा विभाग ऑफिसमध्ये ऑफ लाइन हजेरी भरण्यासाठी जात असताना जिण्यामध्ये संबधीत विद्यार्थी आला. व माझा तुम्ही सर्वांसमोर अपमान केला. त्यामुळे मी परीक्षेचा पेपर दीला नाही. असे म्हणत परीक्षा अधिकारी यांच्या हातातील हजेरी रिपोर्ट हिसकावून घेतले. ते फेकुन देत असताना त्यास प्रतिकार केला असता त्याने अंगावर धावुन जात कानाखाली मारली व सरकारी कामात अडथळा आणला. फिर्यादी यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.