पुणे : न्यू इयरसाठी आता फक्त काही तास उरले आहेत. प्रत्येकाचे पार्टीचे विविध प्लॅन ठरले असतील. न्यू इयरला मद्यपान माेठ्या प्रमाणावर केले जाते. परंतु जर तुम्ही दारु पिऊन रात्री गाडी चालवत बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा निर्णय आत्ताच मागे घ्या. तुम्ही केलेल्या प्लॅनपेक्षा मास्टर प्लॅन पुणे पाेलिसांनी केला असून जर तुम्ही दारु पिऊन गाडी चालवलीत तर तुमचा जाॅब सुद्धा जाऊ शकताे. कारण पुणे पाेलिसांनी मागील वर्षी नवीन वर्षाच्या सुरवातीला दारु पिऊन आणि इतर वाहतूकीचे नियम माेडणाऱ्या तब्बल 50 हजार वाहनचालकांचा डेटाबेस तयार केला असून तुम्ही दारु पिऊन गाडी चालवीत असल्याची माहिती तुम्ही काम करत असल्याची ठिकाणी, तसेच जाॅब एजन्सीज आणि घरच्यांना देण्याचा विचार पाेलीस करत आहेत. त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात करत असताना वाहतूकीचे नियम माेडण्यात येणार नाही याकडे आवर्जुन लक्ष द्या.
पुण्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी एक संदेश दिला असून त्यात त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत करत असताना दारु पिऊन गाडी न चालविण्याचे तसेच वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन पुणेकरांना केले आहे. यंदा पाेलिसांनी न्यू इयरसाठी माेठा पाेलीस बंदाेबस्त तैनात केला असून दारु पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. ड्रन्क अॅन्ड ड्राईव्ह विराेधात विशेष माेहिम हाती घेण्यात आली असून आज रात्री 10 पासून या माेहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी पुण्यातील सीसीटिव्ही कॅमेरांचा देखील आधार घेण्यात येणार आहे. त्याचबराेबर माेठ्याप्रमाणावर नाकाबंदी देखील करण्यात येणार आहे. 125 टीम्सच्या माध्यमातून 240 ब्रिथ अॅनलायझर्स च्या मदतीने कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईचे व्हिडीओ शुटिंग सुद्दा करण्यात येणार आहे.
दारु पिऊन गाडी न चालविण्याचे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले आहे.