पुणे : माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती द्यायची नसेल तर संबंधित कार्यालयाकडून अनेक कारणे दाखवून माहिती देण्याचे टाळले जाते. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला तर थेट बिहारला बोलावण्यात आले आहे. तुमच्या सोयीनुसार वेळ ठरवून कार्यालयात या आणि हवी ती माहिती घेऊन जा, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या बिहार राज्यातील दरभंगा येथील कार्यालयातून कळविण्यात आले आहे. पुण्यातील संजय शिरोडकर यांना हा अनुभव आला आहे. ते टोलचे अभ्यासक असून त्यांनी काही दिवसांपूर्वी आरटीआयअंतर्गत देशभरातील विविध राज्यांमधील टोलबाबतची माहिती मागविली आहे. काही राज्यांकडून त्यांना ही माहिती पाठविण्यातही आली आहे. तर काही राज्यांकडून पैसे भरण्यास सांगतिले आहे. काही राज्यांकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे दरभंगा येथे कार्यालय आहे. शिरोडकर यांनी या कार्यालयाकडूनही बिहार राज्यातील टोलची माहिती मागविली आहे. मात्र, या कार्यालयाने संबंधित माहिती मागितलेल्या तपशीलात उपलब्ध नाही. आपण दिवस निश्चित करून कार्यालयाला कळवावे. त्यानुसार कार्यालयाकडून कळविले जाईल. यादिवशी कार्यालयात येऊन माहिती घ्यावी,असे कळविले आहे. याविषयी नाराजी व्यक्त करताना शिरोडकर म्हणाले, पुणे ते दरभंगा हे अंतर जवळपास २ हजार किलोमीटर एवढे आहे. मागील १३ वर्षांत ७ हजारांहून अधिक अर्ज केले. पण अशाप्रकारे एवढ्या लांब माहिती घेण्याबाबत कोणत्याही कार्यालयाने बोलाविले नाही. पुणे किंवा मुंबई याठिकाणी बोलाविले जाते. त्यांना राज्यातील पहिला टोल कधी सुरू झाला, सध्या टोलची संख्या, मिळणारे उत्पन्न, टोलचे दर, टोलचे अहवाल अशी माहिती मागविली आहे. ही माहिती अत्यंत सोपी आणि कार्यालयाने सहजपणे देणे शक्य आहे. खरेतर ही माहिती आरटीआय अंतर्गत संकेतस्थळावरच उपलब्ध असणे अपेक्षित आहे. पण कार्यालयांकडून टाळाटाळ केली जाते. एवढ्या दूर माहितीसाठी बोलाविणे म्हणजे माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचाच प्रकार आहे.
बिहारला या...आणि हवी ती माहिती घेऊन जा..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:02 PM
पुण्यातील संजय शिरोडकर यांनी काही दिवसांपूर्वी आरटीआयअंतर्गत देशभरातील विविध राज्यांमधील टोलबाबतची माहिती मागविली आहे...
ठळक मुद्देमागील १३ वर्षांत ७ हजारांहून अधिक अर्ज ही माहिती अत्यंत सोपी आणि कार्यालयाने सहजपणे देणे शक्य एवढ्या दूर माहितीसाठी बोलाविणे म्हणजे माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचाच प्रकार