पुणे : जीवनात एखादा अवघड प्रसंग आला की तुमच्यातील गुणांची कसोटी लागते. परिस्थिती फासे टाकत असते आणि आपल्यासमोर आव्हाने उभी करीत असते. ते फासे सोडवत हसत खेळत आयुष्य जगता आले पाहिजे, असे मत ज्येष्ठ कवयित्री आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
डाॅ. मुकुंद कोठावदे लिखित आणि एकदंत प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित ‘एकदंत- व्यथा नव्हे कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अरूणा ढेरे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. डाॅ. मुकुंद कोठावदे यांच्या पत्नी माधुरी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माधुरी कोठावदे यांनी ज्या लढावू वृत्तीने कर्करोगासारख्या आजाराचा धीरोदात्तपणे सामना केला त्या प्रवासावर आधारीत हे पुस्तक आहे. यावेळी डाॅ. मुकुंद कोठावदे उपस्थित होते.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “जन्म आणि मृत्यू या गोष्टी सृष्टीतल्या सर्वांच्याच वाट्याला येणार आहेत. या दोन्ही मधले जगणे माणूस कसे सुंदर करतो यावर त्या जगण्याची गुणवत्ता ठरते. कर्करोगासारख्या आजाराशी सुमारे साडेअकरा वर्षांहून अधिक काळ झुंज देत त्यांनी त्यांच्यातील योद्ध्याचीच प्रचिती दिली आहे. आजारपणाचे कोणतेही भांडवल न करता मुलीचे लग्न असो किंवा परदेशवारी असो त्या भरभरून आणि रसरसून जगल्या. कर्करोगाच्या उपचारांच्या वेदनांचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर कधी जाणवला नाही.” लेखक डाॅ. मुकुंद कोठावदे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका मांडली.