बारामती : ‘आपको माँ चाहिए, बहु चाहिए, बिवी भी चाहिए.... लेकिन बेटी क्यो नहीं चाहिए..? असा सवाल फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवकांनी बेटी बचाव अभियान राबविताना उत्तरेकडील राज्यांमधील नागरिंकाशी संवाद साधताना केला. दहा हजार किमीचा प्रवास करून या युवकांनी उत्तर-पूर्व राज्यांत बेटी बचावचा स्वखर्चातून जागर केला. बेटी बचावचा संदेश देण्यासाठी अरुणाचल, आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये चार युवकांनी २६ दिवसांमध्ये ५ हजार नागरिकांशी संवाद साधला. उदमाईवाडी येथील (ता. इंदापूर) योगेश थोरात याच्यासह विशाल सवाई, विकास जाधव, खंडू डोके या चौघा युवकांनी २२ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान हा प्रवास केला. यादरम्यान युवकांनी भाषेचा अडसर बाजूला ठेवून हिंदी भाषेत संवाद साधला. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अशी साद या युवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून येथील नागरिकांना घातली. याशिवाय, विज्ञान जागृतीचा संवाद तेथील विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा ठरला. बेटी बचाव आणि विज्ञान जनजागृती संवादातून तेथील विद्यार्थी-नागरिकांशी आपुलकीचे नाते निर्माण झाल्याचे या युवकांनी सांगितले. कोलकाता येथून या अभियानाला सुरवात झाली. गुवाहाटी, तिनसुखिया, तेजपूर या शहरांमध्ये पथनाट्य, प्रयोग प्रदर्शन अभियान राबविण्यात आले. आसाम राज्यानंतर अरुणाचल प्रदेशात लोवर दिवांग व्हॅली जिल्ह्यात शाळांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी चौघा विद्यार्थ्यांनी संवाद साधला. त्यानंतर अरुणाचलमधील तवांग, बॉमडिला या जिल्ह्यांत हे अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून हा उपक्रम राबविला. पुणे येथील ज्ञानप्रबोधिनीचे डॉ. विजय स्वामी, जयंतो बोरा यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.या अभियानाचा अनुभव सांगताना थोरातवाडी (ता. इंदापूर) येथील योगेश थोरात म्हणाला, ‘‘हा सर्व प्रवास सकारात्मक विचार देणारा होता. सामाजिक विषमता कमी करण्यासाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियान राबविले. तेथील नागरिकांनी त्याला मोठी पसंती दिली.(वार्ताहर)
‘आपको माँ, बहू, बिवी चाहिए... लेकिन बेटी क्यों नहीं चाहिए?
By admin | Published: December 22, 2016 1:42 AM