पुणे : ‘‘तुम्हाला अक्कल येऊ नये, तुम्हाला डोळे येऊ नये, अशी आजच्या व्यवस्थेची इच्छा आहे. कारण तुम्ही शहाणे व्हाल ना ! पण तुम्ही संविधान वाचा, महात्मा फुले यांचे साहित्य वाचा, तुम्हाला समतेचा, योग्य विचार समजेल, मी देखील फुलेंचे साहित्य वाचल्यानंतरच योग्य मार्गावर आलो,’’अशी भावना प्रसिध्द दिग्दर्शक, लेखक, अभिनेते नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली. तसेच महापुरूषांमुळे आज आपण चांगले जगू शकतो, पण त्या महापुरूषांनाही आपण वाटून घेतले, तर जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही, असेही ते म्हणाले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना गुरूवारी (दि.२८) प्रदान करण्यात आला. रुपये एक लाख, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता भूमी, फुले वाडा, पुणे येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला. या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, वैशाली बनकर, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव आदी उपस्थित होते.
मंजुळे म्हणाले, माझी आणि महात्मा फुले यांची ओळख एक वेगळ्या टप्प्यावर झाली. मी अंधश्रद्दा, भांडणे, व्यसनाधीता या विश्वात वावरत होतो. पण फुले यांचे साहित्य, त्यांचे विचार आत्मसात केल्यानंतर योग्य मार्गावर आलो. आज समाजात संकुचित विचार खूप वाढत आहे. लोक भक्त होत आहेत. खरंतर समतेचा विचार घेऊन आपण पुढे जायला हवे. शिवरायांनी सर्वांना सोबत घेतले, शाहू महाराज, महात्मा फुले, आंबेडकर अशा महापुरूषांनी सर्वांना सोबत घेतले होते. तो विचार आज आपल्याला पुढे न्यायचा आहे. विचार पुढे नेणारे खरे वंशज असतात. आपण या महापुरूषांचे वंशज आहोत. त्यांचे विचार नेऊया.’’
भुजबळ म्हणाले, आपले प्रेरणास्थान हे फुलेवाडा आहे. वैचारिक ‘पावर स्टेशन’ म्हणजे हा वाडा. ही समताभूमी. येथे मंजुळे यांना आपण समता पुरस्कार देतोय. कारण त्यांनी सर्व क्षेत्रात ठसा उमटवला. त्यांनी चित्रपटातून सामाजिक प्रश्नावंर आवाज उठवला. लोकांसमोर हे प्रश्न मांडणे हे खूप महत्त्वाचे आहे. ते समतेचा विचार घेऊन पुढे जात आहेत. आपण सर्वांनी देखील तेच करणे अपेक्षित आहे.’’